मंचरजवळील निघोटवाडीत शॉर्टसर्किटची भीषण आग चार घरे जळाली, लाखोंचे नुकसान, जबाबदारीवरून वाद

0
मंचरजवळील निघोटवाडीत शॉर्टसर्किटची भीषण आग चार घरे जळाली, लाखोंचे नुकसान, जबाबदारीवरून वाद

मंचरजवळील निघोटवाडीत शॉर्टसर्किटची भीषण आग चार घरे जळाली, लाखोंचे नुकसान, जबाबदारीवरून वाद

मंचरजवळील निघोटवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत चार घरे भस्मसात. सुमारे 15 लाखांचे नुकसान. ग्रामस्थांचा महावितरणवर आरोप, तर महावितरणने फेटाळले दावे.

पुणे ११ एप्रिल २०२६ : मंचरजवळील निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी दुपारी भरवस्तीत भीषण आग लागून चार घरे जळून खाक झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, वीजपुरवठ्यातील शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या आगीत दागिने, रोख रक्कम, धान्य, शालेय साहित्य, भांडीकुंडी आणि सागवानी लाकडाचे छप्पर जळून सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. अनेक कुटुंबांचा निवारा हिरावल्याने ते उघड्यावर आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण)ने ग्रामस्थांचे आरोप फेटाळत तपासानंतरच भूमिका स्पष्ट करू असे सांगितले आहे.

या दुर्घटनेत सुमन दशरथ निघोट यांच्या घराचे सर्वाधिक नुकसान झाले. त्यांच्या घरातील अंदाजे दहा तोळे सोने, ३५ हजार रुपये रोख, धान्यसाठा, शालेय पुस्तके, संसारोपयोगी वस्तू आणि सागवानी छप्पर पूर्णपणे जळून खाक झाले. त्यांच्या कुटुंबाचे सुमारे १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. संगीता महादेव चिखले यांचे घरही पूर्णतः जळाले असून त्यांचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. निलेश नंदकुमार निघोट आणि सुभाष कोंडीबा निघोट यांच्या घरांनाही आगीचा फटका बसून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.

आगीची माहिती मिळताच सरपंच नवनाथ निघोट, पतसंस्थेचे अध्यक्ष किसनराव निघोट आणि स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. याच वेळी मुंबई अग्निशमन दलात कार्यरत ज्ञानेश्वर निघोट हे गावात यात्रेसाठी आले होते. त्यांनी प्रसंगावधान राखत घरातील तीन गॅस सिलेंडर बाहेर काढले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या प्रयत्नात ते किरकोळ भाजले आहेत. ग्रामस्थांनी त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.

ग्रामस्थांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून परिसरात व्होल्टेज चढ-उतार होत होता. याबाबत पाच दिवसांपूर्वी फोन आणि ऑनलाईनद्वारे तक्रारही करण्यात आली होती, असे सरपंचांनी सांगितले. तरीही वेळीच दखल न घेतल्याने ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत आणि पुनर्वसन द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मात्र महावितरणचे सहाय्यक अभियंता गफर शेख यांनी सांगितले की, मीटरपर्यंत वीजपुरवठा सुरळीत असल्याचे प्राथमिक तपासात दिसते. मीटरनंतरच्या अंतर्गत वायरिंगमध्ये दोष असल्यास त्याची जबाबदारी महावितरणची नसते. घटनेची सखोल तपासणी करण्यासाठी इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर लवकरच भेट देणार असून त्यांच्या अहवालानंतर अधिकृत भूमिका मांडली जाईल.

पंचायत समिती सदस्य शिवाजीराव निघोट यांनी महावितरणवर हलगर्जीपणाचा आरोप करत तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली. लेखी तक्रार करूनही दुर्लक्ष झाले, असे त्यांनी नमूद केले. “जर मदत मिळाली नाही, तर ग्रामस्थ पुढील विजबिल भरणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तपास अहवालानंतर जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीच्या मदतीची अपेक्षा लागून आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *