मनसे-सेना युती : पुण्यात झळकले एकत्र बॅनर, राजकीय चर्चांना नवे वळण

0
पुण्यात काका पुतण्याचे एकत्र बॅनर झळकले

पुण्यात काका पुतण्याचे एकत्र बॅनर झळकले

मनसे-सेना युतीची शक्यता वाढली आहे. पुण्यात राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या एकत्र वाढदिवस बॅनरमुळे राजकीय चर्चांना नवे चांगले बळ मिळाले आहे.

सायली मेमाणे

पुणे : 9 जून २०२५ : पुणे – महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राजकीय घडामोडींना वेग आला असताना, दुसरीकडे पुणे शहरात झळकलेल्या एका खास बॅनरने चर्चेचे वादळ निर्माण केले आहे. या बॅनरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

हा बॅनर इतकाच विशेष नव्हता, पण त्यात दोघेही नेते एका छायाचित्रात एकत्र झळकत असल्यामुळे, आगामी मनसे-सेना युती या चर्चेला एक वेगळे वळण मिळाले आहे.

राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ जूनला तर आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस १२ जूनला असतो. दोघांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तयार करण्यात आलेला हा शुभेच्छा फलक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

राजकीय वर्तुळात याचे वेगळे अर्थ लावले जात आहेत. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या प्रकारच्या बॅनरमधून भविष्यातील संभाव्य राजकीय समीकरणांची झलक मिळते. विशेषतः शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच दिलेले सूचक विधान – “महाराष्ट्राला जे हवे आहे, तेच होईल” – यामुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.

२०१९ नंतर दोन्ही पक्ष वेगवेगळ्या वाटांनी गेले. मात्र, २०२४ मध्ये दोघांचीही निवडणूक कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. शिवसेना (UBT) ला केवळ २० जागा मिळाल्या तर मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये संभाव्य युतीची शक्यता पुन्हा समोर येत आहे.

काका-पुतण्या असलेल्या राज आणि आदित्य ठाकरे यांचे वैयक्तिक नाते स्नेहाचे असले तरी, राजकारणात ते अनेक वर्षे वेगळ्या वाटेवर होते. मात्र मराठी अस्मिता, स्थानिक स्वाभिमान आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्यांवर दोघांचे विचार अनेकदा समान राहिले आहेत.

पुण्यातील हे बॅनर एखाद्या राजकीय प्रयोगाची सुरुवात ठरेल की केवळ सामाजिक शिष्टाचार म्हणून घेतलं जावं – यावर अजून स्पष्टता नाही. पण यामुळे मनसे आणि शिवसेना (UBT) यांच्यात युतीबाबत चर्चेला उधाण आले आहे, हे निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed