मराठवाड्यात दिलासादायक चित्र: धरणांमध्ये 86% पाणीसाठा, पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ
मराठवाड्यात दिलासादायक चित्र: धरणांमध्ये 86% पाणीसाठा, पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ
मराठवाड्यातील जायकवाडी, येलदरी, पैनगंगा यांसह 11 प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठा 86% पर्यंत पोहोचला. मागील वर्षीपेक्षा जलसाठ्यात लक्षणीय वाढ, शेतकरी व नागरिकांना दिलासा.
सायली मेमाणे
पुणे १६ ऑगस्ट २०२५ :मराठवाड्यात यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे धरणांमध्ये जलसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. मागील 24 तासांत छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, बीड आदी जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून, काही ठिकाणी ढगफुटीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि जलसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांसह संपूर्ण मराठवाड्याला मिळणार आहे.
सध्या मराठवाडा विभागातील 11 प्रमुख प्रकल्पांमध्ये एकूण पाणीसाठा 86.01 टक्के इतका झाला आहे. ही स्थिती मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत समाधानकारक आहे, कारण याच काळात गेल्या वर्षी केवळ 33.87 टक्के पाणीसाठा होता. यंदा जायकवाडी धरणात 92.90%, पैनगंगा (ईसापूर) मध्ये 95.46%, येलदरी मध्ये 94.08%, निम्न तेरणा धरणात 95.40%, आणि सिद्धेश्वरमध्ये 86.60% पाणीसाठा आहे. त्यामुळे सिंचन, पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता अधिक चांगली राहणार आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षी मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत होती. मात्र यंदा वेळीच आणि भरपूर प्रमाणात झालेल्या पावसामुळे स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. जायकवाडीसारख्या प्रमुख धरणात पाणीसाठा 90 टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे औरंगाबादसह अनेक जिल्ह्यांचा जलसिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
मराठवाड्यातील पाणीसाठ्याची ही सकारात्मक आकडेवारी केवळ सध्यासाठी नव्हे, तर आगामी काही महिन्यांसाठीही दिलासादायक ठरणारी आहे. सततच्या पावसामुळे पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पाणीपुरवठा सुरळीत राहील. जलव्यवस्थापन योग्य पद्धतीने केल्यास, या पाणीसाठ्याचा उपयोग आगामी हिवाळी हंगामातही होऊ शकतो.