माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन; मावळच्या राजकीय, शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा

0
माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन

मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे वृद्धापकाळाने निधन. ८९ वर्षांचे वय. चार टर्म आमदार, शिक्षणमहर्षी व मावळ भूषण पुरस्कारांनी सन्मानित. शरद पवार यांचे निकटवर्तीय.

सायली मेमाणे

पुणे १ जुलै २०२५ : मावळचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते कृष्णराव भेगडे यांचे ३० जून रोजी रात्री ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मावळ तालुक्यात राजकीय आणि सामाजिक शोककळा पसरली आहे. आज (१ जुलै) सकाळी ११ वाजता लेख पॅराडाईज येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असून बनेश्वर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

१९७२ साली भारतीय जनसंघाच्या तिकीटावर मावळमधून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. १९७७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत १९७८ मध्ये पुन्हा आमदार झाले. त्यांनी दोन वेळा विधान परिषदेवरही प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे, शरद पवार यांच्यासाठी त्यांनी स्वतःहून विधानपरिषदेचा राजीनामा दिला होता आणि १९९४ मध्ये पुन्हा ते विधान परिषद सदस्य झाले. २००० साली त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली.

राजकारणाबरोबरच शिक्षण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालयांची उभारणी केली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ‘शिक्षणमहर्षी’ आणि ‘मावळ भूषण’ या सन्मानाने गौरवण्यात आले होते. संयमी नेतृत्व, सर्वपक्षीय सन्मान, आणि सर्वसामान्यांमध्ये लोकप्रियता यामुळे भेगडे हे एक आदर्श लोकप्रतिनिधी होते.

ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते आणि संघाच्या विचारधारेतून प्रेरित होऊन जनसंघात सहभागी झाले. पुढे विविध राजकीय प्रवाहांतून त्यांनी मावळच्या विकासात मोलाचा वाटा उचलला.

त्यांच्या निधनामुळे मावळ तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रावर मोठी पोकळी निर्माण झाली असून, विविध मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत शोक व्यक्त केला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *