मुंबईकरांनो काळजी घ्या! मलेरिया, गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव वाढतोय, दररोज 30 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद
मुंबईत पावसाळा सुरू होताच मलेरिया, गॅस्ट्रो व डेंग्यूचा विळखा वाढतोय
मुंबईत पावसाळ्यात गॅस्ट्रो व मलेरियाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जून महिन्यात दररोज 30 रुग्ण, यंदा मलेरियाचे 2857, डेंग्यूचे 452 रुग्ण नोंदले; लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
सायली मेमाणे
मुंबई ३ जुलै २०२५ : मुंबईत पावसाळा सुरू होताच मलेरिया आणि गॅस्ट्रो या आजारांनी डोके वर काढले आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जून महिन्यात दररोज सरासरी ३० ते ३१ नागरिकांना गॅस्ट्रोचा त्रास होत आहे, तर २८ ते २९ लोकांना मलेरियाची लागण होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दूषित पाण्याचा वापर, अनहायजेनिक अन्नाचे सेवन, उघड्यावर मिळणारे खाद्यपदार्थ यामुळे पोटाचे विकार आणि डासांपासून पसरणारे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यावर्षी जानेवारी ते जून दरम्यान मलेरियाचे एकूण २८५७ रुग्ण सापडले असून, डेंग्यूची लागण ४५२ जणांना झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत मलेरियाचे २०५५ रुग्ण नोंदवले गेले होते. डेंग्यूची आकडेवारी गेल्या वर्षी ४३१ होती, तर यंदा त्यात किरकोळ वाढ दिसून येते. मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून जानेवारी ते जून २०२५ दरम्यान १३६ जणांना चिकनगुनियाचा त्रास झाल्याचे नमूद करण्यात आले आहे, जे मागील वर्षी फक्त २१ होते.
सद्यस्थितीत गॅस्ट्रो, मलेरिया आणि डेंग्यूसारखे आजार थेट नागरिकांच्या आरोग्यावर घाला घालत आहेत. विशेषतः लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्ती आणि आधीपासून आजारी असलेले रुग्ण या आजारांपासून अधिक धोक्याच्या स्थितीत असतात. BMC कडून नागरिकांना पाणी उकळून पिण्याचा, उघड्यावर मिळणाऱ्या अन्नपदार्थांपासून दूर राहण्याचा, आणि पाण्याची साठवण स्वच्छ पद्धतीने ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आरोग्याशी संबंधित कोणतीही लक्षणं – ताप, उलटी, जुलाब, अंगदुखी, डोकेदुखी – आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्यथा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. अनेक भागांमध्ये पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून, हीच स्थिती डेंग्यू व मलेरियाच्या प्रसारास पोषक ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराच्या आजूबाजूच्या परिसरात डासांची पैदास होऊ न देणे आणि वेळोवेळी फॉगिंग वा कीटकनाशकांची फवारणी करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे.
शहराच्या विविध भागांमध्ये गेल्या महिनाभरात आरोग्यविषयक तक्रारी वाढत असल्याने महापालिकेने जनजागृती मोहिमाही हाती घेतली आहे. आरोग्य विभागाच्या मते, गेल्या काही वर्षांत पावसाळी आजारांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे. आरोग्य रक्षक उपाय योजना आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे, याशिवाय दुसरा पर्याय नाही. मुंबईत यंदाचा पावसाळा आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरू नये यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली आणि कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे.