मुंबईतील खासगी कोचिंग क्लासेसची तपासणी होणार; १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
मुंबईतील खासगी कोचिंग क्लासेसची तपासणी होणार; १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
मुंबईतील खासगी कोचिंग क्लासेसच्या कामकाजावर मोठी कारवाई! विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेला १५ दिवसांत तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. शुल्क, परवाना, आणि सुरक्षा तपासली जाणार.
सायली मेमाणे
पुणे ३१ ऑक्टोबर २०२५ : मुंबई : राज्यातील खासगी कोचिंग क्लासेसच्या कारभारावर आता सरकारकडून सखोल तपासणीची तयारी सुरू झाली आहे. मुंबई शहरात कार्यरत असलेल्या कोचिंग क्लासेसच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेने या संदर्भात एक समिती गठित करून शहरातील सर्व खासगी कोचिंग क्लासेसची तपासणी करून १५ दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
ही कारवाई विशेषतः विद्यार्थ्यांची फसवणूक, करचोरी, आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन अशा गंभीर तक्रारींच्या पार्श्वभूमीवर केली जात आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक खासगी क्लासेसकडून चुकीची माहिती देऊन मोठे शुल्क आकारले जात असल्याचे लक्षात आले आहे. पावसाळी अधिवेशन २०२५ दरम्यान विधानपरिषद सदस्य राजेश राठोड यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना दिल्यानंतर विधानभवनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विविध अधिकारी उपस्थित होते. त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, कोचिंग क्लास सुरू असलेली जागा अधिकृत आहे का, अग्निसुरक्षा व पार्किंगची सोय आहे का, आणि निवासी इमारतीत अनधिकृतपणे क्लास सुरू करण्यात आले आहेत का, याची तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच, विद्यार्थ्यांकडून घेतले जाणारे शुल्क प्रत्यक्ष दाखवलेल्या रकमेपेक्षा जास्त असल्यास त्यावर आर्थिक अनियमिततेची चौकशी व्हावी, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातच नव्हे, तर राज्यातील इतर शहरांमधील कोचिंग क्लासेसचीही तपासणी करण्यात येणार आहे. अनेक कोचिंग क्लासेस कर चुकवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून घेतलेले मोठे शुल्क कमी दाखवतात, तसेच व्यावसायिक परवानगी नसलेल्या ठिकाणी वर्ग सुरू ठेवतात, अशी माहिती मिळाली आहे. या सर्व गोष्टींची सविस्तर चौकशी करून संबंधित विभागाने कारवाई करावी, असे निर्देश सभापतींनी दिले.
या बैठकीत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी माहिती दिली की, राज्य सरकार सध्या खासगी कोचिंग क्लासेससाठी स्वतंत्र विधेयक तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. या विधेयकात क्लासेसच्या नोंदणी, परवानगी, आणि शुल्क नियंत्रणासंदर्भात स्पष्ट तरतुदी असतील. त्यांनी सांगितले की, “हे विधेयक परिपूर्ण आणि सर्वसमावेशक असावे यासाठी जनतेकडूनही सूचना मागविण्यात येतील.”
सभापती प्रा. राम शिंदे यांनी या विधेयकाबाबत सांगितले की, खासगी क्लासेसवर नियंत्रण ठेवणारा कायदा तयार झाल्यास विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण होईल आणि शिक्षणक्षेत्रातील पारदर्शकता वाढेल. त्यांनी आगामी हिवाळी अधिवेशनात हे विधेयक सादर करण्यात यावे, असे सूचित केले.
या कारवाईमुळे मुंबईसह राज्यभरातील कोचिंग क्लासेसवर आता प्रशासनाचे कठोर लक्ष केंद्रित झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह आर्थिक पारदर्शकतेची हमी देण्यासाठी ही तपासणी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.