मुंबईत कारचा भीषण अपघात, सीटबेल्टमुळे दाम्पत्याचे प्राण वाचले; वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक
मुंबईत कारचा भीषण अपघात, सीटबेल्टमुळे दाम्पत्याचे प्राण वाचले; वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक
मुंबई अंधेरी फ्लायओव्हरवर कार दोन वेळा उलटली, मात्र सीटबेल्टमुळे दाम्पत्याचा जीव वाचला. वाहतूक पोलिसांनी 15 मिनिटांपूर्वी दिलेल्या सल्ल्यामुळे अपघात टळला. जाणून घ्या काय घडलं!
सायली मेमाणे
पुणे २९ जुलै २०२५ : मुंबईतील अंधेरी परिसरात शनिवारी सायंकाळी एक चित्तथरारक घटना घडली. एका चाळीशीतील दाम्पत्याचा जीव अवघ्या काही मिनिटांच्या आत घडलेल्या एका निर्णयामुळे वाचला आणि यामागे कारणीभूत ठरला मुंबई वाहतूक पोलीसाचा सतर्क सल्ला. गोरेगावमध्ये राहणारे गौतम रोहरा आणि त्यांची पत्नी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरातून अंधेरीच्या दिशेने कारने प्रवास करत होते. मुसळधार पावसामुळे रस्ते ओले आणि निसरडे झाले होते. अशा परिस्थितीत कलानगरजवळ कॉन्स्टेबल प्रवीण क्षीरसागर रस्त्याच्या कडेला ड्युटीवर उभे होते. त्यांनी गौतम यांची कार अडवून निरीक्षण केले आणि लक्षात आले की त्यांच्या पत्नीने सीटबेल्ट लावलेला नव्हता.
त्यांनी तत्काळ सूचित केलं की नियमांनुसार सहप्रवाशाने देखील सीटबेल्ट लावणे बंधनकारक आहे. “एक हजार रुपयांचा दंड होईल, पण त्याहीपेक्षा अपघात झाला तर जीवावर बेतू शकतं” असं सांगून त्यांनी त्या दाम्पत्याला सीटबेल्ट लावण्यास भाग पाडलं. हा सल्ला ऐकून गौतम व त्यांच्या पत्नीने दोघांनीही सीटबेल्ट लावला आणि प्रवास पुढे सुरू केला. केवळ 15 मिनिटांनंतर जे घडलं, त्याने सर्वांनाच हादरवून टाकलं.
अंधेरी फ्लायओव्हर उतरत असताना त्यांच्या कारचे नियंत्रण सुटले आणि कारने दोन वेळा पलटी घेतली. अपघात इतका जोरदार होता की कारचे मोठे नुकसान झाले, मात्र दोघांनाही किरकोळ खरचटण्याव्यतिरिक्त मोठी इजा झाली नाही. डॉक्टरही आश्चर्यचकित झाले की अशा अपघातातून हे दाम्पत्य सुरक्षित कसे राहिले! त्याचे उत्तर फक्त एकच – सीटबेल्ट आणि वाहतूक पोलिसांचा वेळीच दिलेला सल्ला.
अपघातानंतर या दाम्पत्याने थेट BKC येथील वाहतूक पोलिस चौकीत जाऊन कॉन्स्टेबल प्रवीण क्षीरसागर यांचे आभार मानले. त्यांनी समाजमाध्यमांवर आपला अनुभव शेअर करत मुंबई पोलिसांची प्रशंसा केली. मुंबई पोलिसांच्या या तत्परतेमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, हे या घटनेतून पुन्हा सिद्ध झाले आहे. सोशल मीडियावर याचे कौतुक होत असून ‘देवदूत’ म्हणत नागरिक पोलिसांची स्तुती करत आहेत.