मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील 32 तासांच्या कोंडीवर राज ठाकरे संतप्त; प्रवाशांचा टोल परत करण्याची मागणी
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील 32 तासांच्या कोंडीवर राज ठाकरे संतप्त; प्रवाशांचा टोल परत करण्याची मागणी
मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील 32 तासांच्या वाहतूक कोंडीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर तीव्र टीका करत प्रवाशांचा टोल परत देण्याची मागणी केली आहे.
पुणे ०५ जानेवारी २०२६ : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीमुळे हजारो वाहनचालक आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मंगळवारी संध्याकाळी गॅस टँकर उलटल्याच्या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र ही कोंडी तब्बल 32 तास कायम राहिल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या संपूर्ण घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त करत सरकार आणि प्रशासनाच्या उदासीनतेवर जोरदार टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून आपली भूमिका मांडताना सांगितले की, मुंबई आणि पुणे ही राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं असल्याचे सरकार सांगते, मात्र या दोन शहरांमधील महत्त्वाचा द्रुतगती मार्ग 32 तास ठप्प राहतो आणि सरकार शांतपणे पाहत बसते, हा कोडगेपणा अनाकलनीय आहे. अशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रस्ता कमीत कमी वेळेत मोकळा करण्यासाठी प्रशासनाकडे ठोस कृती आराखडा होता का, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, या आणि अशा अनेक घटनांनंतर सरकारकडून नेहमीप्रमाणे चौकशीचे आदेश दिले जातात. मात्र या चौकशांतून पुढे काही निष्कर्ष निघतात का आणि प्रशासन काही धडा घेतं का, हा खरा प्रश्न आहे. गॅस टँकर उलटल्यानंतर वाहतूक थांबवणे योग्य होते, मात्र त्यानंतर पर्यायी मार्ग, यंत्रणा आणि मनुष्यबळ वापरून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती तत्परता का दाखवली गेली नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून उभारलेल्या या द्रुतगती मार्गाला 24 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या काळात संभाव्य आपत्ती, अपघात किंवा तांत्रिक अडचणी यांचा विचार करून संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राखण्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. त्यांच्या मते, या काळात सर्वात तत्परतेने केली गेलेली एकमेव गोष्ट म्हणजे टोल वसुली. टोल घेतला जात असेल तर सरकार आणि टोल वसूल करणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी फक्त रस्ता बांधण्यापुरती मर्यादित नसून प्रवाशांना मूलभूत सुविधा आणि सुरक्षित प्रवास देण्याचीही आहे.
या घटनेनंतर राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल करण्यात आला, तो सरकारने परत केला पाहिजे. केवळ चौकशीचा फार्स न करता भविष्यात अशा घटना घडल्यास तात्काळ उपाययोजना कशा राबवल्या जातील याचा सविस्तर कृती आराखडा तयार करून तो जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली. राज्यात पालकमंत्री असतानाही नागरिकांना निराधार वाटावे अशी परिस्थिती निर्माण होते, याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information