मुंबई महापालिका निवडणुकीत देवाधर्माची धावपळ; विजयासाठी उमेदवारांची तीर्थयात्रा
मुंबई महापालिका निवडणुकीत देवाधर्माची धावपळ; विजयासाठी उमेदवारांची तीर्थयात्रा
BMC Election 2026 पार्श्वभूमीवर मुंबईतील उमेदवार विजयासाठी देवाधर्म, पूजा-पाठ व ज्योतिषीय उपायांकडे वळले आहेत. राजकीय वातावरण तापले.
०३ जानेवारी २०२६ : मुंबईतील अनेक उमेदवारांनी रात्रीतून तीर्थक्षेत्रांकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. काहीजण आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी गावाकडे जात आहेत, तर काही उमेदवार शिर्डी, शनी शिंगणापूर, पंढरपूर, नाशिक यांसारख्या प्रसिद्ध देवस्थानांमध्ये जाऊन खास पूजा-अर्चा करत असल्याचे चित्र दिसत आहे. निवडणूक प्रचाराच्या धावपळीतही उमेदवार वेळ काढून देवांना साकडे घालत आहेत. पुढील पंधरा दिवसांत संपूर्ण मतदारसंघ विजयाकडे वळवायचा असल्याने, कोणतीही जोखीम नको या मानसिकतेतून धार्मिक आणि ज्योतिषीय उपायांचा आधार घेतला जात आहे.
काही उमेदवारांनी आपल्या आहार आणि जीवनशैलीतही बदल केल्याचे दिसून येत आहे. विशेष पथ्ये, उपवास, विशिष्ट रंगांचे कपडे, ठराविक वेळेला पूजा किंवा दर्शन, अशा अनेक गोष्टी निवडणुकीशी जोडल्या जात आहेत. काही ठिकाणी गुरु, बाबा-बुवा किंवा ज्योतिषांकडून मार्गदर्शन घेतले जात असून, मंत्र-तंत्र आणि तोडगे यांचाही वापर सुरू असल्याची चर्चा आहे. मुंबईसारख्या महानगरातही अशा प्रकारच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा निवडणूक काळात उफाळून येताना दिसत आहेत.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार 15 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान होणार असून, 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. अर्ज छाननी आणि माघारीनंतर आता रिंगणातील उमेदवारांची संख्या स्पष्ट झाली असून, प्रत्येक मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. याच पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून देवाधर्माची धावपळ वाढली आहे.
मात्र या सगळ्या प्रकारावर सामाजिक संघटनांकडून टीकाही केली जात आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशा धार्मिक आणि अघोरी प्रथांचा निषेध केला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी लिंबू-मिरची उतारे, मंत्र-तंत्र किंवा अनिष्ट प्रथांचा वापर करणे हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही, असे मत अंनिसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची पायमल्ली होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
राजकीय रणधुमाळीत सध्या उमेदवारांचे पाय जमिनीवर कमी आणि देवस्थानांवर अधिक पडत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. मात्र अंतिम निर्णय हा मतदारांच्या हातातच आहे. कोणताही ग्रह, मंत्र किंवा तोडगा निवडणूक जिंकवू शकत नाही, तर मतदारांचा विश्वास आणि मतांची ताकदच निकाल ठरवते, हे वास्तव आहे. मुंबई महापालिका निवडणूक यंदा केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक आणि मानसिकतेचा आरसाही ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information