मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; २२७ वॉर्डांची वर्गवारी बदलली, अनेक दिग्गजांचे गणित ढासळले

0
मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; २२७ वॉर्डांची वर्गवारी बदलली, अनेक दिग्गजांचे गणित ढासळले

मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; २२७ वॉर्डांची वर्गवारी बदलली, अनेक दिग्गजांचे गणित ढासळले

मुंबई महानगरपालिकेच्या २२७ वॉर्डांसाठी आरक्षण जाहीर; OBC, SC, ST आणि महिलांसाठी किती वॉर्ड राखीव? तेजस्विनी घोसाळकर, मिलिंद वैद्य यांच्यासह अनेकांचे राजकीय गणित बदलले. संपूर्ण यादी तपासा.


सायली मेमाणे

११ नोव्हेंबर २०२५ : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत अखेर जाहीर झाली असून २२७ प्रभागांसाठीची राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्व पक्षांमध्ये उमेदवारी आणि प्रभागनिहाय नियोजनाला वेग आला असताना, या सोडतीने अनेक मान्यवर नेते आणि विद्यमान माजी नगरसेवकांचे राजकीय गणितच बदलून टाकले आहे. ठाकरे गटातील तेजस्विनी घोसाळकर आणि माजी नगरसेवक मिलिंद वैद्य यांच्यासह अनेकांच्या मतदारसंघावर आरक्षणाचा थेट परिणाम झाला आहे.

महानगरपालिकेच्या आरक्षण संरचनेनुसार एकूण २२७ प्रभागांपैकी ११४ जागा महिलांसाठी राखीव आहेत. यात खुला महिला गट, ओबीसी महिला, एससी महिला आणि एसटी महिला प्रवर्गांचा समावेश होतो. सर्वसाधारण खुला गट १४९, नागरिकांचा मागासवर्ग (OBC) ६१, अनुसूचित जाती (SC) १५ आणि अनुसूचित जमाती (ST) २ प्रभागांसाठी आरक्षित आहे. मुंबईसारख्या मोठ्या महानगराच्या राजकीय संरचनेत महिलांसाठी जवळपास अर्ध्या जागा राखीव ठेवल्याने महिला उमेदवारांना मोठी संधी निर्माण झाली आहे.

या आरक्षणाचा सर्वाधिक परिणाम ठाकरे गटावर झाल्याचे मानले जात आहे. वॉर्ड क्रमांक १, जिथे तेजस्विनी घोसाळकर उमेदवारीची तयारी करत होत्या, तो प्रभाग आता OBC महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीच्या शक्यतेवर तात्पुरता विराम लागला आहे. तसेच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मिलिंद वैद्य यांचा वॉर्ड क्रमांक १८२ हा पूर्वी सर्वसाधारण प्रवर्गासाठी होता; मात्र आता तो OBC खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. यामुळे या वॉर्डमध्ये उमेदवारीसाठी नवे समीकरण तयार होणार आहे.

अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एकूण १५ प्रभागांपैकी ८ महिला आणि ७ पुरुषांसाठी प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक १३३, १८३, १४७, १८६, १५५, ११८, १५१, १८९ हे SC महिला प्रभाग असून २६, ९३, १४६, १५२, २१५, १४१, १४० हे SC खुल्या प्रवर्गातील प्रभाग आहेत. अनुसूचित जमातींसाठी प्रभाग क्रमांक १२१ (ST महिला) आणि ५३ (ST खुला) असे दोन प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.

OBC प्रवर्गात एकूण ६१ प्रभागांचा समावेश असून त्यातील ३० प्रभाग OBC महिला तर ३१ प्रभाग OBC सर्वसाधारण/खुल्या गटासाठी आहेत. वॉर्ड क्रमांक १, ६, ११, १३, १९, ३२, ३३, ४६, ४९, ५२, ७२, ८०, ८२, १०५, १०८, ११७, १२८, १२९, १३०, १५०, १५३, १५८, १६७, १७०, १७६, १९१, १९८, २१६, २२३, २२५, २२६ हे प्रभाग OBC महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. तर ४, १०, १२, १८, २७, ४१, ४५, ५०, ६३, ६९, ७०, ७६, ८५, ८७, ९१, ९५, १००, १११, ११३, १३५, १३६, १३७, १३८, १७१, १८२, १८७, १९३, १९५, २०८, २२२ हे OBC खुल्या प्रवर्गातील प्रभाग आहेत.

या आरक्षणामुळे अनेक प्रभागांत नवे चेहरे उमेदवार म्हणून समोर येण्याची शक्यता असून अनेक अनुभवी नगरसेवकांना आपले प्रभाग बदलावे लागतील किंवा पक्षांमध्ये नवे राजकीय पर्याय शोधावे लागतील. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाचे मोठे स्थान असून, त्यावर संपूर्ण निवडणूक नियोजन, उमेदवारी आणि प्रचार धोरणे अवलंबून असतात. जाहीर झालेल्या आरक्षण यादीमुळे आता सर्व राजकीय पक्षांकडून प्रभाग पातळीवरील अभ्यास, नवीन संपर्क मोहीमा आणि उमेदवारांच्या तयारीला अधिक वेग येणार आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *