मुंबई विमानतळ दुर्मीळ वन्यजीव प्रकरणात बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक
मुंबई विमानतळ दुर्मीळ वन्यजीव प्रकरण
मुंबई विमानतळावर बँकॉकहून आलेल्या प्रवाशाच्या बॅगेतून दुर्मीळ वन्यजीव सापडले. विभागाने प्राण्यांची सुटका करून आरोपीस अटक केली आहे.
सायली मेमाणे
पुणे १० जून २०२५ : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेतून दुर्मीळ वन्यजीव प्राणी आढळल्याने सीमाशुल्क विभागाने तातडीने कारवाई करत संबंधित प्रवाशाला अटक केली आहे. या प्रकरणात आरोपीकडून संरक्षणाधीन वन्यजीवांची तस्करी होत असल्याचा संशय असून त्याचा आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
बँकॉकवरून मुंबईत उतरल्यानंतर संबंधित प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून विचारणा केली. त्याच्या वागणुकीतून अस्वस्थता आणि भीती दिसून आल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याची बॅग तपासली. तपासणीदरम्यान त्या बॅगेतून विविध दुर्मीळ आणि संरक्षित प्राणी जिवंत अवस्थेत आढळून आले. या प्राण्यांमध्ये एक चाको गोल्डन नी टरंट्युला, एक ब्रान्चपेल्मा टरंट्युला, ८० इग्वाना (यामध्ये ३० मृतावस्थेत), सहा ल्युसिस्टिक शुगर ग्लायडर, एक फायर टेल्ड सनबर्ड, एक पर्पल थ्रोटेड सनबर्ड, दोन क्रेस्टेड फिंचबिल, एक हनी बेअर आणि दोन ब्राझिलियन चेरी हेड कासवे यांचा समावेश होता. यापैकी अनेक प्रजाती वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत संरक्षित असून, त्यांची बेकायदेशीर वाहतूक गुन्हा ठरतो.
सीमाशुल्क विभागाने पंचनामा करून सर्व प्राणी ताब्यात घेतले असून वन्यजीव तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार व काळजी घेतली जात आहे. या प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित प्रवाशाविरोधात सीमा शुल्क कायदा १९६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे.
तपास अधिकाऱ्यांनी या तस्करीच्या मागे आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्कर टोळीचा हात असण्याची शक्यता वर्तवली आहे. आरोपीकडून चौकशी सुरू असून त्याचे संपर्क, मोबाईल डिव्हाइसेस आणि इतर साधनांची तपासणी करून अधिक माहिती मिळवली जात आहे. सध्या सीमाशुल्क व वन्यजीव विभाग संयुक्तपणे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
ही कारवाई वन्यजीव तस्करीविरोधात एक महत्त्वाची पावलं मानली जात असून मुंबई विमानतळावर अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांची दक्षता अधिक वाढवली जाण्याची शक्यता आहे. ही घटना वन्यजीव संरक्षणासाठी जागरूकतेची गरज अधोरेखित करते, तसेच बेकायदेशीर मार्गाने जैवविविधतेवर होणाऱ्या हल्ल्यांचा पर्दाफाश करते.