मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यात डिझेलऐवजी पाणी भरलं! 19 गाड्या बंद; प्रशासनात खळबळ
मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये डिझेलऐवजी पाणी भरल्याची धक्कादायक घटना
एमपी सीएम मोहन यादव यांच्या ताफ्यातील 19 गाड्यांमध्ये डिझेलऐवजी पाणी भरल्याने खळबळ उडाली. रतलामजवळ घडलेल्या घटनेमुळे पेट्रोल पंप सील करण्यात आला असून, प्रशासन आणि भारत पेट्रोलियमकडून तपास सुरू आहे.
सायली मेमाणे
पुणे २८ जून २०२५ : मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये डिझेलऐवजी पाणी भरल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील ढोसी गावाजवळ घडली. या प्रकारामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, संबंधित पेट्रोल पंप तातडीने सील करण्यात आला आहे. मोहन यादव ‘एमपी राईज २०२५’ या महत्त्वपूर्ण कॉन्क्लेव्हसाठी रवाना झाले असताना ही घटना गुरुवारी रात्री घडली.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ वाहनं डिझेल भरण्यासाठी ढोसीजवळील भारत पेट्रोलियमच्या पंपावर थांबली होती. गाड्यांमध्ये अंदाजे २० लिटर डिझेल टाकण्यात आले होते. मात्र काही किलोमीटर अंतर गेल्यावर सर्व गाड्या एकामागोमाग बंद पडल्या. यामुळे शासकीय यंत्रणा सतर्क झाली आणि संबंधित गाड्यांच्या इंधन टाक्या उघडण्यात आल्या. त्यावेळी टाक्यांमध्ये डिझेलऐवजी तब्बल १० लिटर पाणी असल्याचे स्पष्ट झाले.
या घटनेनंतर मुख्यमंत्री कार्यालयासह स्थानिक प्रशासन आणि भारत पेट्रोलियमचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. नायब तहसीलदार आशिष उपाध्याय, अन्न व नागरी पुरवठा अधिकारी आनंद गोरे आणि अन्य प्रशासकीय अधिकारी तातडीने तपासासाठी पोहोचले. गाड्यांची तपासणी करण्यात आली. संबंधित गाड्या विशेषतः इंदूरहून बोलवण्यात आलेल्या १९ इनोव्हा कार होत्या, ज्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी नियुक्त करण्यात आल्या होत्या.
या गंभीर घटनेनंतर प्रशासनानं संबंधित भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप तातडीनं सील केला आहे. यासंदर्भात प्राथमिक चौकशी सुरू असून, दोषी अधिकाऱ्यांवर आणि पंप ऑपरेटरवर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच पेट्रोल पंपच्या साठवण टाक्यांची तपासणी करून पाण्याचे प्रमाण आणि भेसळीची पद्धत याचा मागोवा घेतला जात आहे.
गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कॉन्क्लेव्हसाठी CM मोहिमेवर निघाले होते. परंतु ताफ्यातील सर्व वाहनं बंद पडल्यामुळे तातडीने इंदूरहून इतर वाहनांची सोय करण्यात आली आणि मुख्यमंत्री त्यांच्या नियोजित कार्यक्रमाकडे रवाना झाले. या सर्व प्रक्रियेमुळे ‘एमपी राईज २०२५’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे राज्यात सरकारी यंत्रणेत सतर्कता वाढली आहे. इतक्या महत्त्वाच्या ताफ्यात अशा प्रकारे भेसळयुक्त इंधन भरले जाणं ही सुरक्षा आणि दक्षतेच्या दृष्टीने गंभीर बाब मानली जात आहे. काही ट्रक चालकांनीही अशाच प्रकारच्या तक्रारी केल्यामुळे हा प्रकार व्यापक स्वरूपाचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारत पेट्रोलियमकडून अधिकृत तपास सुरू असून, दोषी ठरल्यास पंप परवाना रद्द करण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यभरात सरकारी वाहनांना डिझेल भरताना अतिरिक्त खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात येण्याची शक्यता आहे.
हा प्रकार केवळ एका तांत्रिक चूक म्हणून पाहता येणार नाही, कारण यात मुख्यमंत्री ताफ्यासारखी अति संवेदनशील व्यवस्था प्रभावित झाली आहे. अशा घटनांमुळे सरकारी यंत्रणेतील इंधन व्यवस्थापनाच्या पारदर्शकतेबाबतही प्रश्न उपस्थित होतात. आता प्रशासनाकडून सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा आहे.