राज ठाकरे देवेंद्र फडणवीस बैठक; ताज हॉटेलमधील संभाव्य भेटीने चर्चांना उधाण
राज ठाकरे देवेंद्र फडणवीस बैठक
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक? महापालिका निवडणुका आणि युतीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले.
सायली मेमाणे
मुंबई १२ जून २०२५ : मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनपेक्षित भेट झाल्याची माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्या राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत असून ठाकरे गट आणि मनसेच्या संभाव्य युतीच्या चर्चाही तापल्या आहेत. या पार्श्वभूमीवर झालेली ही बैठक अतिशय लक्षवेधी ठरली आहे.
राज ठाकरे यांचे या हॉटेलमधील आगमन सर्वप्रथम दिसून आले आणि काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही ताज हॉटेलमध्ये दाखल झाले. दोघांमध्ये जवळपास एक तासभर काहीतरी महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे वृत्त काही माध्यमांकडून देण्यात आले आहे. ही भेट केवळ योगायोग आहे की ठरवून घेतलेली गुप्त बैठक हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या घटनेने महापालिकेतील संभाव्य राजकीय समीकरणांबाबत अनेक तर्कवितर्कांना सुरूवात झाली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जवळीक आणि युतीच्या शक्यतेनेच वातावरण तापले असताना, राज ठाकरे यांनी फडणवीस यांची अचानक भेट घेतल्यामुळे राजकीय समीकरणात नवे वळण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपविरोधात प्रचार केला होता, परंतु २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे आता मनसेची भूमिका कोणत्या बाजूने झुकते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आज दुपारी राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. ताज हॉटेलमधील चर्चेनंतर त्या बैठकीत काय निर्णय घेतले जातात आणि राज ठाकरे काय भूमिका स्पष्ट करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. जर मनसे आणि भाजपमध्ये युती झाली, तर ती निवडणुकांमध्ये मोठा राजकीय भूकंप ठरू शकते, असा तर्क अनेक राजकीय विश्लेषकांकडून लावला जात आहे.