राणी बागेतील पेंग्विनवर २५ कोटींचा खर्च! माहिती अधिकारातून महत्त्वाची माहिती उघड
राणी बागेतील पेंग्विनवर २५ कोटींचा खर्च!
मुंबईच्या राणी बागेत गेल्या ५ वर्षांत पेंग्विनच्या देखभालीवर तब्बल २५ कोटींचा खर्च झाल्याचं माहिती अधिकारातून उघड. सिंहाच्या बदल्यात पेंग्विन देण्याचा प्रस्ताव ठरला निष्फळ.
सायली मेमाणे
मुंबई ३ जुलै २०२५ : मुंबईकरांसाठी आकर्षण ठरलेली राणीची बाग (विजेठा जिजामाता उद्यान आणि प्राणीसंग्रहालय) ही पेंग्विनसाठी प्रसिद्ध आहे. २०१७ साली आलेल्या ८ पेंग्विनची संख्या आज २१ वर पोहोचली आहे. मात्र या आकर्षणाच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेला गेल्या ५ वर्षांत तब्बल ₹२५ कोटींपेक्षा अधिक खर्च करावा लागल्याचं वॉचडॉग फाउंडेशनचे गॉडफ्रे पिमेंटा यांनी माहिती अधिकारात उघड केले आहे.
🔍 दरमहा पेंग्विनसाठी ४३ लाखांचा खर्च!
१ जानेवारी २०२० ते ३१ मे २०२५ या कालावधीत पेंग्विनच्या देखभालीसाठी २५.८३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. याचा अर्थ दरवर्षी सरासरी ५.१६ कोटी, तर दरमहा तब्बल ४३ लाख रुपये खर्च होत आहे.
🧊 तापमान नियंत्रणासाठी मोठा खर्च
पेंग्विन ही अंटार्क्टिका सदृश थंड हवामानात राहणारी प्रजाती असल्याने त्यांच्या वसाहतीसाठी खास वातानुकूलित एनक्लोजर तयार करण्यात आले. तापमान नियंत्रण, आहार, वैद्यकीय तपासणी व देखरेखीसाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता यामुळे खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो.
🦁 सिंहासाठी पेंग्विन देण्याचा प्रयत्न फसला
राणी बागेत सध्या सिंह नाहीत. त्यामुळे महापालिकेने हैदराबाद, जुनागढ आणि केरळ येथील प्राणीसंग्रहालयांशी सिंहाच्या जोडीच्या बदल्यात दोन पेंग्विन जोड्या देण्याची चर्चा केली. मात्र, कोट्यवधींच्या देखभाल खर्चामुळे या ठिकाणांनी नकार दिला. यामुळे सिंह, लांडगा आणि पाणमांजर आणण्याचा पालिकेचा प्रयत्न अद्याप अपूर्णच आहे.
🌿 उद्यान व प्राणीसंग्रहालयाच्या देखभालीवर तब्बल ₹१०५ कोटी
संपूर्ण राणी बागेच्या व्यवस्थापनासाठी ५.५ वर्षांत ₹१०५.५९ कोटी खर्च झाला असून त्यामध्ये:
- उद्यान देखभाल – ₹३१.२० कोटी
- हाऊसकीपिंग – ₹२७.११ कोटी
- इतर कामे – ₹२१.४३ कोटी
- पेंग्विन देखभाल – ₹२५.८३ कोटी
एकूण ६,६०० पेक्षा अधिक झाडं आणि ३५६ प्राणी-पक्षी असलेल्या या उद्यानासाठी ही रक्कम खर्च झाली आहे.
📉 काय आहे पर्याय?
महापालिकेला पेंग्विनच्या देखभालीसाठी प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा विशेष निधी उभारण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच सिंह, वाघ, लांडगे यांसारख्या प्राण्यांसाठी देशांतर्गत प्राणी आदान-प्रदानाच्या प्रक्रियेला अधिक सक्रिय स्वरूप देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.