राहुल गांधी मानहानी प्रकरणात उत्तरासाठी ३ जुलैपर्यंत मुदत; सावरकरांवरील वक्तव्यावरून खटला
राहुल गांधी सावरकर मानहानी खटला न्यायालय
पुण्यातील विशेष न्यायालयाने राहुल गांधींना सावरकरांवरील कथित मानहानी प्रकरणात उत्तर सादर करण्यासाठी ३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.
सायली मेमाणे
पुणे १३ जून २०२५ : पुण्यातील विशेष न्यायालयाने काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना राहुल गांधी मानहानी प्रकरण संदर्भात ३ जुलैपर्यंत उत्तर सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. हा खटला स्वतंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी कथित अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल त्यांचे वंशज सत्यकी सावरकर यांनी दाखल केला आहे. या प्रकरणात राहुल गांधी यांनी ब्रिटन दौर्यात केलेल्या वक्तव्यात एका पुस्तकाचा संदर्भ दिला होता. त्यामुळे सत्यकी सावरकर यांच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज दाखल करून त्या पुस्तकाची प्रत न्यायालयात सादर करण्याची मागणी केली होती.
विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी ही मुदत देताना पुढील सुनावणीची तारीख ३ जुलै निश्चित केली आहे. या खटल्यात सत्यकी सावरकर यांचे वकील अॅड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले की, सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींनी केलेली विधाने पारदर्शक आणि जबाबदारीने असली पाहिजेत. त्यामुळे संबंधित पुस्तकाची माहिती महत्त्वाची ठरते.
राहुल गांधींच्या वतीने अॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात वेळ मागितली. त्यांनी सांगितले की, सध्या गांधी यांच्यावर अनेक सार्वजनिक आणि घटनात्मक जबाबदाऱ्या असल्यामुळे तात्काळ कागदपत्र सादर करणे शक्य नाही. याशिवाय, त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ९३ अंतर्गत दाखल केलेला अर्ज आव्हानित केला. हा अर्ज प्रकरण दाखल होताना लागू नव्हता, त्यामुळे तक्रारदाराने न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला.
यावर प्रत्युत्तर देताना अॅड. कोल्हटकर यांनी या विलंबाला हेतुपुरस्सर ठरवत, मूळ मुद्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हणाले. या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून यामध्ये दोघेही राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वे असल्यामुळे प्रकरणाचे महत्त्व अधिक आहे. आता ३ जुलै रोजी न्यायालयात गांधींचे उत्तर सादर होईल व पुढील कायदेशीर प्रक्रिया ठरवली जाईल.