रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांच्या लग्नात अडथळा; क्रिकेटपटूच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पुढे ढकलली तारीख
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांच्या लग्नात अडथळा निर्माण झाला
क्रिकेटर रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोज यांचे लग्न आता पुढे ढकलण्यात आले आहे. १८ नोव्हेंबरला नियोजित विवाह सोहळा आता फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर; जाणून घ्या नेमके कारण.
सायली मेमाणे
२४ जून २०२५ : रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांच्या लग्नात अडथळा निर्माण झाला असून, नियोजित विवाह सोहळा सध्या पुढे ढकलण्यात आला आहे. क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा नुकताच साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. १८ नोव्हेंबर रोजी वाराणसीतील नादेसर येथील हॉटेल ताजमध्ये लग्नसोहळा होणार होता. या विवाहासाठी पाहुण्यांसाठी खोल्याही बुक करण्यात आल्या होत्या. मात्र आता हे लग्न पुढे ढकलण्यात आले असून, त्यामागे कारण आहे रिंकू सिंगचे क्रिकेट वेळापत्रक.
ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान रिंकू सिंगचा व्यस्त देशांतर्गत क्रिकेट सीझन आहे. त्यामुळे त्याला लग्नासाठी वेळ मिळणे शक्य नसल्याने दोन्ही कुटुंबांनी एकमताने तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन लग्नतारीख अद्याप निश्चित झालेली नसली, तरी फेब्रुवारीमध्ये हा विवाह होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रिया सरोजचे वडील आणि आमदार तूफानी सरोज यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं की लग्न गावात न होता दुसऱ्याच ठिकाणी होईल, कारण लग्नात अनेक हाय-प्रोफाइल पाहुण्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. त्यामुळे व्यवस्था अधिक सोयीची ठिकाणी करण्याची गरज आहे.
८ जून रोजी झालेल्या साखरपुडा समारंभानंतर रिंकू सिंगने एक भावनिक पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, “हा दिवस आमच्या हृदयात बराच काळ होता. जवळपास तीन वर्षांची वाट पाहणे आज सार्थकी लागले.” ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आली होती.
सध्या रिंकू आणि प्रिया यांच्या विवाहतारीखेच्या बदलामुळे चाहत्यांमध्ये नवीन उत्सुकता निर्माण झाली असून, दोघांचे लग्न कधी आणि कुठे पार पडते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Do‑follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz