लुधियाना ड्रम हत्या प्रकरण: दोरीने बांधलेला मृतदेह आढळला, मेरठप्रमाणे थरारक हत्येचा संशय
निळ्या ड्रममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ; मेरठनंतर लुधियानात हत्येचा थरारक प्रकार समोर
लुधियानाच्या शेरपूर भागात निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये हात-पाय दोरीने बांधलेला मृतदेह आढळला आहे. मेरठच्या घटनेप्रमाणेच हा थरारक हत्येचा प्रकार असल्याचा पोलिसांचा संशय आहे. ओळख अद्याप पटलेली नाही.
सायली मेमाणे
२६ जून २०२५: निळ्या ड्रममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ; मेरठनंतर लुधियानात हत्येचा थरारक प्रकार समोर
Ludhiana Drum Murder Case: पंजाबमधील लुधियाना शहरात आणखी एक भीषण हत्याकांड समोर आले असून, शेरपूर औद्योगिक परिसरात एका निळ्या प्लास्टिक ड्रममध्ये अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ड्रममधील मृतदेहाचे हात आणि पाय दोरीने घट्ट बांधलेले होते, त्यामुळे ही हत्या नियोजित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील मेरठमध्येही असाच प्रकार घडला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती असल्याची चर्चा रंगली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांनी ड्रममधून येणाऱ्या प्रचंड दुर्गंधीची तक्रार केली. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांना निळ्या प्लास्टिकच्या ड्रममध्ये गुंडाळलेला मृतदेह सापडला. प्राथमिक तपासात मृतदेहाचे वय अंदाजे ३०–४० वर्षांदरम्यान असून, ड्रम रिकाम्या प्लॉटमध्ये टाकलेला होता. ही हत्या एक-दोन दिवसांची नसून मृतदेह कुजलेला असल्याने काही आठवड्यांपूर्वीचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असून, मृत व्यक्ती स्थलांतरित असण्याचा पोलिसांना संशय आहे. ड्रममधील मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात गुंडाळलेला होता आणि ड्रम तुलनेत नव्याचे असल्याने ही हत्या पूर्वनियोजित असावी, असा अंदाज लावण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी लुधियानातील ४२ ड्रम उत्पादक कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे, तसेच सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करून ड्रम कुठून आणि कोणाच्या माध्यमातून इथे आणला गेला, याचा शोध घेतला जात आहे. ठाणे विभाग क्रमांक ६ चे एसएचओ कुलवंत कौर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु असून, हत्येचा गुन्हा अज्ञात आरोपीविरोधात नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी औद्योगिक भागात वावरत असलेल्या अनोळखी व्यक्तींकडे अधिक सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अशी भयावह प्रकरणे पुन्हा घडू नयेत म्हणून कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली आहे.
मेरठमधील घटनेची आठवण
ही घटना मेरठमधील त्या भयावह हत्याकांडाची आठवण करून देते, ज्यामध्ये एका महिलेनं आपल्या प्रियकरासोबत पतीची हत्या करून त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवून त्यात सिमेंट ओतले होते. त्यामुळे लुधियानात घडलेले हे प्रकरणदेखील त्याच धर्तीवरचे असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तवली आहे.
पोलिसांकडून गुन्ह्याचे गूढ उकलण्याचा प्रयत्न
पोलिस आता या ड्रम हत्याकांडाचा तपास सर्व अंगांनी करत असून, लवकरच मारेकऱ्याला अटक करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रकरण केवळ एक हत्या नव्हे, तर पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता वाढत चालली आहे.