लोणावळ्यात खोट्या UPI स्क्रीनशॉटवरून दुकानदाराला गंडवण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून चौकशी सुरू

0
लोणावळ्यात एका युवकाने बनावट UPI स्क्रीनशॉट वापरून दुकानदाराची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला

लोणावळ्यात एका युवकाने बनावट UPI स्क्रीनशॉट वापरून दुकानदाराची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला

लोणावळ्यात एका युवकाने बनावट UPI स्क्रीनशॉट वापरून दुकानदाराची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

सायली मेमाणे

२६ जून २०२५: लोणावळा हे राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असून, येथे रोज हजारो पर्यटक भेट देतात. याच गर्दीचा फायदा घेत काही भामटे स्थानिक दुकानदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रकार नुकताच उघडकीस आला असून, खोट्या UPI पेमेंट स्क्रीनशॉटचा वापर करत एका युवकाने दुकानदाराला गंडवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र दुकानदाराची सतर्कता आणि पोलिसांची तत्परता यामुळे फसवणूक करणारा भामटा ताब्यात आला आहे.

घटना बुधवारी (दि. २५ जून) दुपारी कुमार चौकात घडली. येथे एका दुकानात ग्राहक बनून आलेल्या युवकाने काही वस्तू खरेदी केल्यानंतर UPI अ‍ॅपद्वारे पेमेंट केल्याचे भासवले. ‘स्टुड पेटीएम’ या बनावट अ‍ॅपमधून खोटा स्क्रीनशॉट तयार करून तो दुकानदाराला दाखवला. मात्र खरे पेमेंट झाले नाही. दुकानदाराच्या मोबाईलवर कोणतीही पेमेंट सूचना आली नव्हती. तसेच स्क्रीनशॉटवरील वेळ आणि परिस्थिती यामध्ये विसंगती जाणवल्याने दुकानदाराला संशय आला.

तत्काळ कृती करत दुकानदाराने सदर युवकाला जवळच असलेल्या कुमार पोलिस चौकीत नेले. त्याठिकाणी पोलीस हवालदार अनिल शिंदे यांनी फसवणुकीचा पर्दाफाश करत, अशा बनावट स्क्रीनशॉट कसे तयार करता येतात याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकच करून दाखवले. पुढील कारवाईसाठी आरोपीला लोणावळा शहर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले आहे.

सदर युवक हा मुंबई परिसरातील असल्याचे समजते. त्याने यापूर्वी अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना घडवल्या आहेत का, याबाबत सखोल तपास सुरू आहे. पोलिसांच्या तपासात असे स्पष्ट झाले की, त्याच्या मोबाईलमध्ये एक बनावट अ‍ॅप आहे, जे खोटे ट्रांजेक्शन दाखवते. प्रत्यक्षात पैसे ट्रान्सफर होत नाहीत, परंतु खोटा UPI यशस्वी पेमेंट स्क्रीन तयार केला जातो.

लोणावळ्यातील गर्दीचा फायदा घेत अनेक भामटे डिजिटल व्यवहाराच्या नावाखाली अशा फसवणुका करत असल्याचे हे आणखी एक उदाहरण ठरले आहे. यापूर्वीही लोणावळा नगर परिषद फ्री पार्किंगच्या ठिकाणी पार्किंग फीच्या नावाखाली एक तरुण भामटा पकडण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक दुकानदार, हॉटेल्स आणि पर्यटकांनी अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे.

लोणावळा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, खरे UPI पेमेंट झाल्याचे खात्री झाल्याशिवाय कोणतीही वस्तू देऊ नये. प्रत्येक व्यवहाराची पुष्टी मिळेपर्यंत फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करावे. अशा बनावट अ‍ॅप्सच्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. हे लक्षात घेता, पोलिसांकडून नियमित निरीक्षण, सायबर क्राईम शाखेची मदत आणि स्थानिक नागरिकांचे सहकार्य आवश्यक बनले आहे.

हा प्रकार डिजिटल व्यवहारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करतो. बनावट अ‍ॅप्स, फेक स्क्रीनशॉट आणि गर्दीचा फायदा घेणारे भामटे ही एक सायबर गुन्हेगारीची नवी दिशा ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणे, व्यवहारांची तपासणी करणे आणि संशयास्पद व्यक्तींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देणे, हीच काळाची गरज आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed