लोणी काळभोरमध्ये ऊसाला आग; कदमवाकवस्ती येथे अडीच एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे 5 लाखांचे नुकसान

0
लोणी काळभोरमध्ये ऊसाला आग; कदमवाकवस्ती येथे अडीच एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे 5 लाखांचे नुकसान

लोणी काळभोरमध्ये ऊसाला आग; कदमवाकवस्ती येथे अडीच एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे 5 लाखांचे नुकसान

लोणी काळभोरच्या कदमवाकवस्ती परिसरात अडीच एकर ऊसाला आग लागून शेतकऱ्याचे सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले आहे. सलग आगीच्या घटनांमुळे शेतकरी चिंतेत असून तातडीच्या मदतीची मागणी केली जात आहे.

पुणे २४ डिसेंबर २०२५ : लोणी काळभोर परिसरात ऊसाला लागणाऱ्या आगीच्या घटनांनी शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. मंगळवारी सहा शेतकऱ्यांचा सुमारे पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच, त्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गुजरवस्ती परिसरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत अडीच एकर क्षेत्रातील तोडणीला आलेला ऊस जळून खाक झाला असून संबंधित शेतकऱ्याचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या घटनेत नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव संपत महादेव गुजर असे आहे. संपत गुजर हे कष्टकरी शेतकरी असून त्यांनी सुरतपट्टीला लागून असलेल्या आपल्या शेतामध्ये अडीच एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती. हा ऊस काही दिवसांतच तोडणीसाठी तयार होणार होता. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.

बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास गुजर यांच्या ऊसाच्या शेतातून अचानक धुराचे लोट उठू लागले. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. याच वेळी लोणी काळभोर पोलीस ठाणे आणि अग्निशामक दलाला घटनेची माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल वैभव खोत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत ऊसाच्या शेतात आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. काही वेळातच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. जवानांनी पाण्याचा जोरदार मारा करून आग आटोक्यात आणली आणि विस्तव पूर्णपणे शमवण्यात यश मिळवले. मात्र, तोपर्यंत अडीच एकर क्षेत्रातील संपूर्ण ऊस जळून खाक झाला होता.

विशेष म्हणजे, याच परिसरात मंगळवारी दुपारी सहा शेतकऱ्यांचा सुमारे पाच एकर ऊस आगीत जळून खाक झाला होता. त्या घटनेत दहा लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सलग दोन दिवसांत झालेल्या या घटनांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऊसाला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग आपोआप लागली की कोणी मुद्दाम लावली, याचा तपास सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संपत गुजर यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच, आगीमागचे कारण शोधून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

ऊस हे या भागातील प्रमुख नगदी पीक असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मुख्य आधार आहे. अशा आगीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून कर्जबाजारीपणाचा धोका वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही केली जात आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed