वाईमध्ये ऑनलाइन गेमिंगचं थैमान; तरुणाची दीड कोटींची उधळपट्टी, आत्महत्येचा प्रयत्न

0
वाईमध्ये ऑनलाइन गेमिंगचं थैमान

वाईमध्ये ऑनलाइन गेमिंगचं थैमान

वाई शहरात ऑनलाइन गेम आणि जुगाराच्या व्यसनाने तरुणांचे आयुष्य धोक्यात; दीड कोटी रुपये गमावून एका युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न.

सायली मेमाणे

पुणे 30 जून २०२५ : वाई : ऐतिहासिक आणि सुसंस्कृत ओळख असलेल्या वाई शहरात कायदा व सुव्यवस्थेचा पार चुराडा झाल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील तरुण पिढी ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जात असून, लाखो रुपये गमावून आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेत असल्याच्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ऑनलाइन गेमिंग आणि जुगाराचं व्यसन वाईमध्ये वेगाने पसरत आहे. ग्रामीण भागातून शहरात शिकायला आलेले विद्यार्थी, तसेच स्थानिक युवक या व्यसनाच्या आहारी जात असून, मोबाईल अ‍ॅप्स, पानटपऱ्या, तसेच इंटरनेट कॅफेमधून सहज उपलब्ध होणाऱ्या गेमिंग प्लॅटफॉर्म्समुळे त्यांची आर्थिक व मानसिक परिस्थिती ढासळत आहे. काही युवकांनी त्यांच्या मोबाईल, दागिने विकून ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे गुंतवले आहेत. पैसे गमावल्यानंतर अनेकजण कर्जबाजारी झाले असून, मानसिक तणावाखाली जगत आहेत.

या पार्श्वभूमीवर तालुक्यातील एका युवकाने तब्बल दीड कोटी रुपये ऑनलाईन गेमवर उधळल्याच्या धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या आर्थिक फटक्यामुळे नैराश्यात गेलेल्या युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला असून तो सध्या उपचार घेत आहे. या प्रकारामुळे तरुण वर्गाला डिजिटल जुगारापासून दूर ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

शहरातील अनेक पारंपरिक जुगार अड्डे देखील उघडपणे चालू असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे हे अड्डे वाई पोलिस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असूनही स्थानिक पोलिसांकडून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नागरिकांनी पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिस केवळ शहराच्या बाहेरून चालणाऱ्या अड्ड्यांवर कारवाई करून दिखावा करत असल्याचंही नागरिकांनी सांगितलं.

वाईतील पिढी शिक्षण, करिअर आणि भविष्य यामध्ये भरभराटीसाठी प्रयत्न करत असताना, ऑनलाइन गेमिंगच्या आहारी जाऊन अनेकांचे आयुष्य अंधारात जात आहे. सामाजिक संघटनांनी आणि पालकांनी याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. सायकोलॉजिकल काउन्सेलिंग, शाळा-महाविद्यालयांमधून कार्यशाळा व मोहीम राबविण्याची गरज आहे. याशिवाय प्रशासनाने लवकरात लवकर डिजिटल जुगार अ‍ॅप्सवर प्रतिबंध घालण्याचे उपाय करणे आवश्यक आहे.

हा प्रकार केवळ वाईपुरता मर्यादित नसून, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये ऑनलाईन जुगाराचा विळखा घट्ट होत असल्याने या समस्येकडे तातडीने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तरुण पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाज, पालक, पोलिस आणि शासन यांची संयुक्त जबाबदारी आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *