शॉकिंग! लग्नाच्या पहिल्या रात्री नववधूची आत्महत्या, खोलीत सापडला मृतदेह; कुटुंबात शोककळा
शॉकिंग! लग्नाच्या पहिल्या रात्री नववधूची आत्महत्या, खोलीत सापडला मृतदेह; कुटुंबात शोककळा
आंध्र प्रदेशातील सत्य साई जिल्ह्यात हर्षिता नावाच्या नवविवाहित तरुणीने लग्नाच्या पहिल्याच रात्री आत्महत्या केली. पंख्याला लटकलेला मृतदेह आढळल्याने लग्नघरात शोककळा पसरली आहे.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑगस्ट २०२५ : आंध्रप्रदेश – लग्नाच्या आनंदी वातावरणात दुःखाचा डोंगर कोसळण्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यात घडली. हर्षिता नावाच्या नवविवाहित तरुणीने लग्नाच्या पहिल्याच रात्री गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना सोमंडेपल्ली येथील मणिकंठ कॉलनीत घडली असून, हर्षिता ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. ४ ऑगस्ट रोजी तिचा विवाह कर्नाटकातील बागेपल्ली येथील नागेंद्रसोबत मोठ्या थाटामाटात पार पडला होता.
लग्नाच्या पहिल्याच रात्री, नववधू-नवरदेवाच्या मधुचंद्रासाठी तयारी सुरु असताना, नागेंद्र मिठाई आणण्यासाठी बाहेर गेला होता. तेव्हा हर्षिता खोलीत एकटी होती. काही वेळाने ती खोलीबाहेर न आल्याने आणि प्रतिसाद न दिल्याने, कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, ती पंख्याला लटकलेली आढळली. तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या अनपेक्षित घटनेने संपूर्ण लग्नघरात शोककळा पसरली आहे. एकीकडे लग्नाचे आनंदाचे वातावरण होते, तर दुसरीकडे अशा दुर्दैवी अंतामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुटुंबीय आणि नातेवाईक शोकमग्न आहेत.