संकल्प ते सिद्धी भाजप मोहीमची पिंपरी-चिंचवडमध्ये सुरुवात; केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार
भारतीय जनता पक्षाने ‘संकल्प ते सिद्धी भाजप मोहीम’
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘संकल्प ते सिद्धी’ मोहीम सुरू केली आहे. दरवाजापर्यंत प्रचार, प्रदर्शनं आणि योग सत्रांचा समावेश.
सायली मेमाणे
पुणे १३ जून २०२५ : पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने ‘संकल्प ते सिद्धी भाजप मोहीम’ सुरू केली आहे. ही मोहीम १६ ते २० जून दरम्यान केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या कारकीर्दीच्या निमित्ताने राबवण्यात येत असून मोदी सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा या अभियानाचा उद्देश आहे. पक्की घरे, ‘हर घर जल’ अभियान, आयुष्मान भारत आरोग्य योजना, आणि इतर विकास योजना याबाबत जनतेला जागरूक करण्यासाठी घरोघरी संपर्क, जिल्हास्तरीय संवाद सत्रं, प्रदर्शनं, आणि योग सत्रे आयोजित केली जातील.
पिंपळे सौदागर येथे झालेल्या ‘विकसित भारत संकल्प सभा’त भाजपचे राज्य सरचिटणीस राजेश पांडे, शहरप्रभारी वर्षा दहाले, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार अश्विनी जगताप आणि अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी वक्त्यांनी सांगितले की, ही मोहीम केवळ प्रचारापुरती मर्यादित नसून नागरिकांशी थेट संपर्क साधून योजनांचा लाभ शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे.
राजेश पांडे यांनी सर्व कार्यकर्त्यांना ही मोहीम काटेकोरपणे राबवण्याचे आवाहन केले. शत्रुघ्न काटे यांनी माहिती दिली की १६, १७ आणि १८ जून रोजी जिल्हास्तरावर प्रदर्शनं, कार्यशाळा आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १७ ते २० जूनदरम्यान योग सत्रंही घेण्यात येणार आहेत.
या मोहिमेमुळे भाजप कार्यकर्त्यांना थेट जनतेशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेवर भर देत आमदार महेश लांडगे यांनी प्रत्येक नागरिकाला विकासाच्या प्रवासात सहभागी करून घेण्याचे आवाहन केले आहे.