संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात एमडी विक्री प्रकरण उघड; सराईत आरोपी अटकेत, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात एमडी विक्री प्रकरण उघड; सराईत आरोपी अटकेत, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
संभाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात एमडी (मेफेड्रोन) विकणाऱ्या सराईत आरोपीला अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने अटक केली. ०.८९ ग्रॅम एमडीसह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, दोन साथीदार फरार.
पुणे ३० डिसेंबर २०२५ : छत्रपती संभाजीनगर शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत रेल्वे स्टेशन परिसरात एमडी (मेफेड्रोन) विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून सुमारे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याचे दोन साथीदार घटनास्थळावरून पसार झाले आहेत. अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने ही कारवाई २८ डिसेंबर रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिल्कमिल कॉलनीतील हमालवाडा रोडवर रेल्वे स्टेशनच्या वॉलकंपाउंडच्या भिंतीलगत एमडी पावडरची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात हलवादार लाला पठाण, सतिष जाधव, विजय त्रिभूवन, नितेश सुंदर्डे आणि गणेश काळे यांचा समावेश होता. पथकाने परिसरात सापळा रचून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले.
रात्री सुमारे १०.३० वाजता दोन संशयित घटनास्थळी आढळून आले. पोलिसांनी छापा टाकताच दोघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. यातील एक आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला, तर दुसऱ्या आरोपीचा पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या खिशात प्लास्टिक पिशवीत ठेवलेली ०.८९ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शेख मिजान शेख नईम (वय २७, रा. गल्ली क्रमांक, सिल्कमिल कॉलनी, रेल्वे स्टेशन परिसर) असे आहे. त्याच्याकडून एमडी पावडरशिवाय अॅपल कंपनीचा आयफोन, दादर–मनमाड रेल्वे तिकीट, दोन धातूच्या चाव्या आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक एकिलवाले करत आहेत.
या कारवाईदरम्यान आरोपीचे दोन साथीदार, कैफ कुरेशी (रा. मदनी चौक, रोशनगेट) आणि मस्तान आरिफ (रा. भिवंडी, मुंबई) हे पसार झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली असून, लवकरच त्यांनाही अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात एमडी विक्रीचे जाळे शहरातील विविध भागांपर्यंत पसरले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
शेख मिजान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात सातारा, क्रांतीचौक आणि जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अमली पदार्थ विक्री, खुनाचा प्रयत्न आणि अवैध शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते, अशा ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होत असल्याने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थ तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information