सावधान! अनम मिर्झाचा ‘गुगल पे’ डिलीटचा निर्णय; खर्चावर नियंत्रणासाठी मोठा दावा
अनम मिर्झाचा 'गुगल पे' डिलीटचा निर्णय; खर्चावर नियंत्रणासाठी मोठा दावा
सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झाने गुगल पे अॅप डिलीट करत UPI पेमेंट थांबवले. खर्च वाचवण्याचा सोपा फंडा शेअर करत चर्चेत आली.
सायली मेमाणे
पुणे २८ जून २०२५ : सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेली व्यक्ती म्हणजे सानिया मिर्झाची बहीण अनम मिर्झा. आपल्या नव्या पोस्टमुळे ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. अनमने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत, स्वतःच्या मोबाईलमधून गुगल पे आणि इतर UPI अॅप्स डिलीट केल्याचे जाहीर केले. तिने स्पष्टपणे सांगितले की, हा निर्णय तिने ‘खर्चावर नियंत्रण’ मिळवण्यासाठी घेतला.
अनम मिर्झा ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सानिया मिर्झाच्या व्यक्तिगत आयुष्यात घडलेल्या घटनांनंतर अनमने तिच्यासोबत वेळ घालवत अनेक पोस्ट्स शेअर केल्या होत्या. यावेळी मात्र तिने स्वतःच्या आर्थिक शिस्तीबद्दल एक महत्त्वाचा अनुभव शेअर केला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, युपीआय अॅप डिलीट केल्यामुळे तिला खर्चावर प्रभावी नियंत्रण मिळवता आलं.
अनमने व्हिडीओमध्ये स्पष्ट सांगितले की, QR कोड स्कॅन न केल्यामुळे आणि झटकन पेमेंट न केल्यामुळे तिला समजले की तिचा पैसा नेमका कुठे जात आहे. हा लहानसा बदल असला तरी याचा आर्थिक नियोजनावर मोठा प्रभाव पडतो, असं ती म्हणाली. तिच्या मते, “स्कॅन नाही, तर खर्च नाही” ही संकल्पना प्रभावी ठरते.
तिने पुढे असेही कबूल केले की, सुरुवातीला या निर्णयामुळे तिला अडचणी आल्या. मित्रांकडून कॉफीसाठी पैसे मागावे लागले. पण हळूहळू ही सवय लागली आणि खर्च कमी होऊ लागला. तिच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेकांनी तिच्या विचारांचे कौतुक करत, “हे सर्वांना आत्मसात करायला हवे,” असे कमेंट्सही केले आहेत.
अनम मिर्झा हिच्या व्यक्तिगत आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर तिने 2016 मध्ये अकबर रशीदसोबत लग्न केलं होतं. मात्र 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नंतर मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा मोहम्मद असदुद्दीनसोबत तिने लग्न केलं. मोहम्मद असदुद्दीनचे क्रिकेट कारकीर्द फारशी यशस्वी ठरली नाही, पण आता तो राजकारणात आपले नशीब आजमावत आहे.
UPI व्यवहारांचे वाढते प्रमाण आणि त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अनम मिर्झाचा हा निर्णय अनेकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. ‘डिजिटल’च्या युगात थोडं ‘मॅन्युअल’ झालं, तरीही आर्थिक शिस्त राखण्याचा तिचा दृष्टिकोन निश्चितच विचार करण्याजोगा आहे.