सासवड नगरपरिषद निवडणूक रंगतदार! संजय जगतापांसमोर उमेदवारीचे मोठे आव्हान
सासवड नगरपरिषद निवडणूक रंगतदार! संजय जगतापांसमोर उमेदवारीचे मोठे आव्हान
सासवड नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांना दोन दिवस बाकी असतानाही भाजप उमेदवार जाहीर नाहीत. संजय जगतापांसमोर जुन्या–नव्यांना एकत्र ठेवण्याचे मोठे आव्हान.
सायली मेमाणे
पुणे १७ नोव्हेंबर २०२५ : सासवड नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता अवघे दोनच दिवस उरले असतानाही अद्याप एकाही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. विशेषतः भाजपच्या उमेदवारांची घोषणा होत नसल्याने आणि आतूनच निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे माजी आमदार संजय जगताप मोठ्या अडचणीत सापडले आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करून ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करणाऱ्या जगतापांसाठी ही निवडणूक त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी ठरणार आहे.
यापूर्वी सासवडमध्ये कॉंग्रेसची सत्ता असताना सर्व निर्णय संजय जगताप एकहाती घेत असत. कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोणाला नाही, याचे अंतिम शब्दही जगतापांचेच असत. त्यांच्या या निर्णयक्षमता आणि राजकीय पकडीमुळे कॉंग्रेसला सासवडमध्ये सत्ता टिकवून ठेवणे सोपे जात होते. मात्र भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली असून उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत सर्वांना विश्वासात घेण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे जगतापांना प्रथमच ‘सर्वाना न्याय देण्याचे’ मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
भाजपमधील असंतोष हा मोठा मुद्दा बनला आहे. सासवडसह संपूर्ण तालुक्यात भाजपची सत्ता नसली तरी अनेक वर्षांपासून भाजपचे निष्ठावान नेते आणि कार्यकर्ते पक्षाचा झेंडा उंच ठेवत होते. या सर्व जुन्या कार्यकर्त्यांना आता उमेदवारीची आशा असून जगतापांनी त्यांना न्याय द्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. तसेच अनेकजण यापूर्वीच स्वतंत्र मोहीम राबवू लागले आहेत. काहींनी प्रभागनिहाय प्रचारयंत्रणा उभी केली असून उमेदवारी मिळेल या विश्वासावर त्यांनी मोठी गुंतवणूकही केली आहे.
नगरसेवक पदांसाठी प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष पद वगळता ११ प्रभागांतून २२ नगरसेवक निवडले जाणार आहेत. मात्र एका प्रभागात दहा ते बारा जण इच्छुक असल्यामुळे स्पर्धा अत्यंत तीव्र झाली आहे. यापूर्वी निवडून आलेले काही माजी नगरसेवकही पुन्हा नियोजनात आहेत. काही उमेदवारांनी तर स्वतःला संधी न मिळाल्यास महिलांच्या आरक्षित प्रभागात पत्नी, बहिण, आई किंवा चुलती यांची उमेदवारी पुढे करण्याची तयारी केली आहे. तसेच सर्वसाधारण प्रभागांत ‘भाऊ, पुतण्या, वडील’ यांच्याही नावांची चर्चा सुरू असल्याने जगतापांपुढील कोडे अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.
याशिवाय काही इच्छुकांनी भाजपकडून तिकीट मिळाले नाही तर शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहितीही समोर आली आहे. सासवडमध्ये शिवसेनेला राष्ट्रवादीशी युती असल्याने आणि आमदार विजय शिवतारे जिंकण्याची कोणतीही संधी सोडणार नसल्याने मजबूत उमेदवारांना हाताशी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ‘तिकीट नक्की मिळेल का?’ या अस्वस्थतेमुळे काही भाजप इच्छुकांचा कल शिंदे गट–राष्ट्रवादी युतीकडे वळण्याची शक्यता आहे.
या सर्व घडामोडींमुळे सासवड नगरपरिषद निवडणूक अत्यंत रंगतदार झाली आहे. संजय जगतापांनी या वेळी निर्णय सर्वमान्य ठेवण्याची गरज आहे, अन्यथा भाजपमध्ये नाराजी वाढू शकते. दुसरीकडे सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या जुने-नवे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. कोण उमेदवार म्हणून निवडला जातो, कोण नाराज होतो आणि कोण विरोधी पक्षात झुकतो — हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.