सिंहगड रोडवर पुन्हा वाहतूक कोंडी, पुणेकर त्रस्त
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावर उड्डाण पुलाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. नागरिक त्रस्त, प्रशासनाकडून दुर्लक्ष.
सायली मेमाणे
पुणे 30 जुलै २०२५ : पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. उड्डाण पुलाचं काम सुरू असल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली असून वाहनांची वाहतूक अडथळ्यांतून पार पडत आहे. यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत.
सकाळी आणि संध्याकाळी ऑफिसच्या वेळेत ही समस्या अधिक गंभीर होते. नागरिकांनी अनेकदा सोशल मीडियावर प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
सिंहगड रोड परिसरात दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना या कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. उड्डाण पुलाचं काम अजून काही दिवस चालणार असल्याने ही समस्या तात्काळ सुटण्याची शक्यता कमी आहे. नागरिकांनी वेळेआधी घराबाहेर पडण्याचा सल्ला घेतला असून पर्यायी मार्गांचा शोध घेतला जात आहे.
प्रशासनाकडून वेळोवेळी वाहतूक व्यवस्थापनासाठी काही कर्मचारी तैनात केले जातात, मात्र ते अपुरे असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे. सिंहगड रोडवरील ही सततची वाहतूक कोंडी पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे आणि येत्या काळात या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना अपेक्षित आहे.