हवेत दोन विमानांची टक्कर: केरळचा भारतीय प्रशिक्षण पायलट श्रीहरी सुकूश याचा दुर्दैवी मृत्यू
कॅनडामधील मॅनिटोबा प्रांतात दोन प्रशिक्षण विमानांची हवेत टक्कर;
कॅनडामधील मॅनिटोबा प्रांतात दोन प्रशिक्षण विमानांची हवेत टक्कर; केरळचा भारतीय पायलट श्रीहरी सुकूश आणि कनाडियन विद्यार्थिनीचा मृत्यू.
सायली मेमाणे
पुणे १० जुलै २०२५ : कॅनडामधील मॅनिटोबा प्रांतात ९ जुलै रोजी सकाळी दोन प्रशिक्षण विमानांमध्ये झालेल्या भीषण हवेतल्या टक्करीनं केरळमधील २१ वर्षीय भारतीय पायलट श्रीहरी सुकूश यास जीव गमवावा लागला. त्याच्यासोबत साव्हाना मे रॉयेस ही २० वर्षीय कनाडियन विद्यार्थीनी देखील मृत्यूमुखी पडली. दोघेही व्यावसायिक पायलट प्रशिक्षण घेत होते.
ही घटना स्टेनबाख साउथ विमानतळाच्या धावपट्टीपासून अवघ्या 400 मीटर अंतरावर घडली. हरव्स एअर पायलट ट्रेनिंग स्कूलमधील दोघे विद्यार्थी सेसना प्रकारच्या सिंगल इंजिन विमानांमध्ये टेक-ऑफ आणि लँडिंगचा सराव करत होते. संस्थेचे अध्यक्ष अॅडम पेनर यांनी सांगितले की, दोघांनी जवळपास एकाच वेळी लँडिंग करण्याचा प्रयत्न केला आणि याच कारणाने विमानांची हवेतच टक्कर झाली.
दोन्ही पायलट रेडिओच्या संपर्कात होते, मात्र एकमेकांच्या उपस्थितीची कल्पना न आल्याने अपघात टळला नाही. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, दोघेही विमानात एकटे होते आणि टक्कर झाल्याच्या क्षणालाच त्यांचा मृत्यू झाला. रॉयल कॅनडियन माउंटेड पोलिस (RCMP) ने दोघांचाही मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी केली आहे.
श्रीहरी सुकूश, केरळचा रहिवासी, याने खासगी पायलट परवाना (PPL) आधीच मिळवला होता आणि तो आता व्यावसायिक पायलट परवाना (CPL) घेण्यासाठी कॅनडामध्ये प्रशिक्षण घेत होता. त्याच्या उज्ज्वल भविष्यासमोर अचानक विराम लागल्याने पायलटिंग समुदायात आणि त्याच्या गावात हळहळ व्यक्त होत आहे.
कॅनडातील टोरांटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने या दुर्घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या अधिकृत निवेदनात, “श्रीहरी सुकूश या युवा भारतीय वैमानिकाच्या अकाली मृत्यूने आम्ही व्यथित झालो आहोत. आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत आणि आवश्यक ती सर्व मदत करत आहोत,” असे म्हटले आहे.
हरव्स एअर ट्रेनिंग स्कूल ही संस्था 1970च्या दशकात सुरू करण्यात आली होती आणि दरवर्षी सुमारे 400 विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेतात. अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पायलटिंगचे स्वप्न साकारण्यासाठी येथे प्रवेश घेतात. या संस्थेच्या विश्वसनीयतेला हा अपघात मोठा धक्का देणारा आहे.
या अपघाताने आंतरराष्ट्रीय पातळीवर वैमानिक प्रशिक्षणातील सुरक्षा पद्धती, निरीक्षण आणि नियोजन या बाबतीत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. एकाच हवेत लँडिंग करताना योग्य समन्वय आणि दृश्यमानतेचा अभाव असलेल्या परिस्थितीत हवेत होणाऱ्या प्रशिक्षण उड्डाणांच्या सुरक्षिततेबाबत आता गंभीर विचार होण्याची गरज व्यक्त होत आहे.