हिंजवडीतील धक्कादायक घटना; 20 मुलांना अंगणवाडीत कोंडून सेविका- मदतनीस बैठकला गेले, व्हिडिओ व्हायरल

0
हिंजवडीतील धक्कादायक घटना; 20 मुलांना अंगणवाडीत कोंडून सेविका- मदतनीस बैठकला गेले

हिंजवडीतील धक्कादायक घटना; 20 मुलांना अंगणवाडीत कोंडून सेविका- मदतनीस बैठकला गेले

हिंजवडीतील अंगणवाडीत 20 मुलांना आत कोंडून सेविका व मदतनीस बाहेरून कुलूप लावून बैठकीला गेल्याचा प्रकार; व्हिडिओ व्हायरल, पालकांमध्ये संताप.

पुणे २७ नोव्हेंबर २०२५ : पुण्यातील हिंजवडी परिसरातून अंगणवाडी व्यवस्थेतील गंभीर बेजबाबदारपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे अंगणवाडीतील सेविका आणि मदतनीस या दोघींनी तब्बल 20 लहान मुलांना अंगणवाडीत कोंडून बाहेरून कुलूप लावून ग्रामपंचायतीच्या बैठकीसाठी गेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा प्रकार बुधवारी, 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील एका अंगणवाडीत सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी कामाच्या वेळेत माजी सरपंचांनी बोलावलेल्या बैठकीला जाण्यासाठी मुलांना पूर्णपणे एकटं सोडले. मुलांना सुरक्षेची कोणतीही व्यवस्था न करता दोघींनी अंगणवाडीत बाहेरून कुलूप लावून येथेून प्रस्थान केले. बंद खोलीत कोंडलेल्या या 20 लहान मुलांना जेंव्हा त्या दोघी परत आल्या, तेंव्हा मुलं भेदरलेली, दचकलेली आणि मोठमोठ्याने रडत असल्याचे आढळून आले.

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ एका ग्रामस्थाने चित्रीत केला असून, तो समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. मुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे हे कृत्य अत्यंत निष्काळजीपणाचे आणि मानवी संवेदनांना काळिमा फासणारे असल्याची पालकांची तीव्र प्रतिक्रिया आहे. मुलांना अशा परिस्थितीत सोडणे हे अंगणवाडीच्या नियमांचाही सरळ सरळ भंग असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

घटनेची माहिती मिळताच मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिरम यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. आदेश मिळताच सेविका आणि मदतनीस यांनी कुलूप उघडून मुलांना बाहेर काढले. सुदैवाने मुलांपैकी कोणालाही शारीरिक दुखापत झाली नाही; मात्र या काळात झालेला मानसिक त्रास आणि भीती पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण करणारी आहे.

पालकांनी या प्रकरणी सेविका आणि मदतनीस यांनी केलेल्या गैरजबाबदार वर्तनाबद्दल कठोर शिस्तभंगाची मागणी केली आहे. मुलांच्या सुरक्षेबाबत जरा तरी जागरूकता न दाखवता एका बैठकीसाठी 20 चिमुकल्यांना बंदिस्त करणे हा गंभीर गुन्हाच असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनीही या कृत्यावर कडक कारवाई व्हावी, अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

या घटनेमुळे सरकारी अंगणवाडीतील मुलांच्या सुरक्षेची पातळी, कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण व्यवस्था आणि कामाच्या वेळेतील शिस्त यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अंगणवाडी हा मुलांसाठी सुरक्षित आणि शैक्षणिक वातावरण पुरवण्याचा उद्देश असलेला उपक्रम आहे. मात्र हिंजवडीतील या घटनेने व्यवस्थेतील त्रुटी आणि देखरेखीतील गंभीर उणिवा समोर आणल्या आहेत.

बालकांचा प्रश्न अत्यंत संवेदनशील असताना अशा प्रकारची निष्काळजीपणा पुन्हा होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना होणे गरजेचे आहे. या प्रकरणातील पुढील चौकशी सुरू असून, दोषींवर योग्य कारवाई होण्याची पालक आणि ग्रामस्थांनी आशा व्यक्त केली आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *