15 ऑगस्टला दहशतवादी हल्ल्याचा धोका, ‘खलिस्तानी’ कट उघड
15 ऑगस्टला दहशतवादी हल्ल्याचा धोका, 'खलिस्तानी' कट उघड
दिल्लीतील स्वातंत्र्य दिनानिमित्त दहशतवादी हल्ल्याचा धोका; खलिस्तानी संघटनेचा स्लीपर सेल सक्रिय, लाल किल्ला व मेट्रो स्थानके लक्ष्य करण्याचा कट.
सायली मेमाणे
पुणे ८ ऑगस्ट २०२५ : 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्लीमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट उघडकीस आला आहे. ‘शीख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी दहशतवादी संघटनेने 15 ऑगस्ट रोजी हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली असून, त्यामुळे संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सूत्रांनुसार, या कटामध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर होणार असून, त्यामध्ये AK-47, RDX आणि हँड ग्रेनेड्स यांचा समावेश आहे.
गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, गुरपतवंत सिंग पन्नूच्या आदेशानुसार, खलिस्तानी स्लीपर सेल लाल किल्ला आणि मेट्रो स्थानकांसह विविध संवेदनशील ठिकाणी खलिस्तान समर्थक घोषणा लिहून दहशत निर्माण करण्याचा कट रचत आहेत. त्यामुळे या सर्व भागांमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी गुन्हे शाखा, विशेष कक्ष आणि सर्व जिल्ह्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘शीख फॉर जस्टिस’ च्या हालचालींवर स्पेशल सेल बारकाईने नजर ठेवत आहे. स्लीपर सेलद्वारे राजधानीतील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला वेळेत आळा घालण्यासाठी सुरक्षेची त्रिस्तरीय व्यवस्था सज्ज आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हा गंभीर धोका लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.