15 रुपयांत टोल पार! केंद्र सरकारची वाहनचालकांसाठी दिलासादायक योजना
वाहन चालकांसाठी आनंदवार्ता! आता केवळ 15 रुपयांत पास करता येणार टोल प्लाझा
वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी! देशातील निवडक टोल प्लाझावर केवळ 15 रुपयांत टोल पार करण्याची केंद्र सरकारची योजना. प्रवास अधिक सुलभ आणि स्वस्त होणार.
सायली मेमाणे
पुणे ५ ऑगस्ट २०२५ : देशातील टोल संकलन प्रणालीत मोठा बदल होत असून, वाहनचालकांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करताना नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचू नये यासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने ही योजना अंमलात येणार असून, यानुसार देशभरातील काही निवडक टोल प्लाझावर वाहनचालकांना केवळ 15 रुपयांत टोल पार करता येणार आहे.
या योजनेमुळे प्रवास अधिक सुलभ होणार असून, टोलवर वेळ वाचणार आहे. यामध्ये प्रायोगिक तत्वावर काही टोल नाक्यांवर शुल्कात लक्षणीय कपात करण्यात आली असून, डिजिटल पद्धतीने टोल वसुलीला अधिक गती देण्यात आली आहे. वाहनचालकांना फास्टॅग किंवा स्मार्ट टोल प्रणालीद्वारे 15 रुपयांचे टोल शुल्क भरून प्लाझा पार करता येणार आहे.
सध्या देशातील अनेक टोल प्लाझावर टोल दर हे 30 रुपयांपासून 120 रुपयांपर्यंत असून, लांब पल्ल्याच्या प्रवासात नागरिकांना आर्थिक भार वाढतो. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने सुलभ व परवडणारी टोल प्रणाली आणण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना तात्पुरती असली तरी सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास देशभरात लागू केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
नवीन टोल व्यवस्था केवळ किफायतशीरच नाही, तर ती वाहतुकीचे अपघात कमी करण्यास आणि वाहतूक सुरळीत करण्यास मदत करणार आहे. वाहनचालकांना टोलवर जास्त वेळ थांबावे लागणार नाही, परिणामी इंधन आणि वेळेची बचत होणार आहे.
या योजनेबाबत वाहनचालकांनी समाधान व्यक्त केलं असून, अनेकांनी सोशल मीडियावरून केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.