पुण्यात दिवाळी फटाके: रात्री १० ते सकाळी ६ निर्बंध, उल्लंघनावर कठोर कारवाई

0
पुण्यात दिवाळी फटाके: रात्री १० ते सकाळी ६ निर्बंध, उल्लंघनावर कठोर कारवाई

पुण्यात दिवाळी फटाके: रात्री १० ते सकाळी ६ निर्बंध, उल्लंघनावर कठोर कारवाई

पुणे पोलीस आयुक्तालयाने दिवाळीसाठी फटाके विक्री आणि उडवण्यावर कडक नियम जाहीर केले; रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत फटाके वाजवण्यास मनाई, उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई.

सायली मेमाणे

पुणे ९ ऑक्टोबर २०२५ : दिवाळी म्हटल्यावर फटाके आणि रोषणाईचा उत्साह येतो, पण पुणे शहरात नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी यावर्षी फटाक्यांवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयाने फटाके विक्री आणि वाजवण्याविषयी नियमावली जाहीर केली असून, नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई होईल, अशी सूचना दिली आहे.

रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके वाजवण्यास पूर्णपणे मनाई आहे. आवाज न करता केवळ रंग निर्माण करणारे फुलबाजी व अनार यास वेळेच्या मर्यादेबाहेर उडवण्यास मुभा असेल. अ‍ॅटमबॉम्ब या अत्यंत धोकादायक स्फोटक फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि जवळ बाळगण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर, १०० पेक्षा जास्त फटाके असलेल्या साखळी फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापर देखील मनाई आहे.

फटाके उडवण्याच्या जागेपासून ४ मीटर अंतरावर १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांवर बंदी आहे. साखळी फटाक्यांसाठी आवाजाची मर्यादा १०५ ते ११५ डेसिबल राखणे आवश्यक आहे. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या परिसरापासून १०० मीटरच्या आत फटाके उडवण्यास मनाई आहे. या परिसरांना सायलेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोणत्याही रस्त्यावर, पुलावर, घाट किंवा सेतूजवळ फटाके फोडणे प्रतिबंधित आहे.

फटाके विक्रेत्यांसाठीही नियम कडक करण्यात आले आहेत. पुण्यात २० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या काळातच तात्पुरते विक्री परवाने वैध राहतील. रस्त्यापासून १० मीटर अंतराच्या आत फटाके फोडणे, फेकणे किंवा अग्निबाण उडवण्यास मनाई आहे. विक्रेत्यांनी आवाजाच्या मर्यादेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल. या निर्बंधांचा उद्देश नागरिकांच्या सुरक्षिततेसह ध्वनी व वायू प्रदूषण कमी करणे आहे.

या वर्षी दिवाळीच्या सणात पुणेकरांनी नियमांचे पालन करून फटाक्यांचा आनंद घेतला, तर सुरक्षितता राखली जाईल आणि प्रत्येकासाठी उत्सव आनंददायी बनेल. नियमांचे पालन करून फटाक्यांचा आनंद घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, अशी सूचना पोलीस प्रशासनाने दिली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed