5 कोटी कॅश, 1.5 किलो सोनं आणि लक्झरी कार्स! लाच घेताना पकडलेल्या DIG कडे CBI ला सापडलं प्रचंड घबाड
5 कोटी कॅश, 1.5 किलो सोनं आणि लक्झरी कार्स! लाच घेताना पकडलेल्या DIG कडे CBI ला सापडलं प्रचंड घबाड
पंजाबचे DIG हरचरण भुल्लर यांना सीबीआयने 5 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर झालेल्या छापेमारीत 5 कोटी कॅश, 1.5 किलो सोनं आणि मर्सिडिज, ऑडीसारख्या लक्झरी कार्स मिळाल्या. या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेत खळबळ माजली आहे.
सायली मेमाणे
पुणे १७ ऑक्टोबर २०२५ : पंजाबमध्ये लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मोठा गंडा उघड केला आहे. 5 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेलेले पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) हरचरण भुल्लर धनकुबेर निघाले आहेत. सीबीआयच्या छापेमारीदरम्यान भुल्लर यांच्या ठिकाणांहून तब्बल 5 कोटी रुपयांची रोख रक्कम, 1.5 किलो सोनं, आणि मर्सिडिज, ऑडीसारख्या अनेक लक्झरी कार्सच्या चाव्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईनंतर पोलिस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रोपडचे DIG हरचरण भुल्लर यांना 5 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर सीबीआयने त्यांच्या विविध ठिकाणांवर एकाच वेळी धाडी टाकल्या. या छाप्यांदरम्यान सापडलेल्या प्रचंड रोख रक्कमेची मोजणी अजूनही सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार, या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून आर्थिक फायद्यासाठी अनेक व्यवसायिकांकडून खंडणी वसूल केली होती.
या प्रकरणात DIG हरचरण भुल्लर आणि त्याच्या एका सहकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. लाचखोरी प्रकरण एकूण 8 लाख रुपयांचं असल्याचं समोर आलं असलं तरी तपासादरम्यान जप्त झालेल्या रोख रकमेचा आकडा कोट्यवधींमध्ये पोहोचला आहे. हरचरण भुल्लर हे 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी असून, ते रुपनगर (रूपनगर रेंज) मध्ये कार्यरत होते.
तक्रारदार उद्योगपतीने सीबीआयकडे दिलेल्या माहितीनुसार, DIG ने एका जवळच्या व्यक्तीद्वारे 8 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याबदल्यात उद्योगपतीविरोधात दाखल झालेलं गुन्हे प्रकरण सेटल करण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं. याशिवाय, त्या उद्योगपतीकडून दर महिन्याला खंडणीची मागणी केली जात असल्याचंही उघड झालं आहे.
तक्रार आल्यानंतर सीबीआयने पडताळणी करत सापळा रचला. चंदीगढच्या सेक्टर 21 भागात DIG च्या जवळच्या व्यक्तीला 8 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर सीबीआयने DIG ला एक कंट्रोल्ड कॉल केला, ज्यात त्याने रक्कम स्वीकारल्याचं कबूल केलं आणि तक्रारदाराला ऑफिसमध्ये बोलावलं. त्याच वेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून दोघांना अटक केली.
या छापेमारीदरम्यान मिळालेल्या संपत्तीच्या तपशीलामुळे संपूर्ण पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. DIG कडे कोट्यवधी रुपयांची रोख, सोने, दागिने, जमीन-जुमल्याचे कागदपत्रे आणि लक्झरी कार्स सापडल्याने या भ्रष्टाचार प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सीबीआय या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, DIG ने आणखी कोणाकडून पैसे उकळले का याचीही चौकशी सुरू आहे.