“ज्याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय त्याने राजकारणात येऊ नये” – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्ट वक्तव्य
“ज्याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय त्याने राजकारणात येऊ नये” – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्ट वक्तव्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळी ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटनावेळी स्पष्ट केले की, ज्याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय त्याने राजकारणात येऊ नये. विकासकामे दर्जेदार व्हावीत, स्थानिकांना संधी मिळावी पण गुणवत्ता अबाधित राहावी, असेही ते म्हणाले.
सायली मेमाणे
पुणे १८ ऑक्टोबर २०२५ : पुणे : “ज्याला कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय त्याने राजकारणात येऊ नये आणि ज्याला राजकारण करायचं आहे त्याने कॉन्ट्रॅक्टर होऊ नये,” अशा स्पष्ट शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आणि जनप्रतिनिधींना इशारा दिला आहे. पिंपळी ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला स्थानिक जनप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, “मला पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मला दोन्हीकडे काम पाहण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. त्यामुळे जे काही कामं सुरू आहेत, ती वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, हे माझं प्राधान्य आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “आमदारांना पाच कोटी रुपयांचा निधी असतो, मात्र मी बारामती शहर आणि तालुक्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणतो. त्यामुळे हा पैसा लोकांच्या उपयोगासाठी आणि टिकाऊ विकासासाठी वापरला गेला पाहिजे.”
पवार यांनी यावेळी विकासकामांच्या गुणवत्तेवर विशेष भर दिला. त्यांनी म्हटलं, “कॉन्ट्रॅक्टर चांगला नसला तर त्याचा त्रास सरकारलाच होतो. दर्जेदार कामं झाली तर नागरिक समाधानी राहतात आणि शासनाचं नावही चांगलं होतं. त्यामुळे स्थानिक मुलांना काम देण्यासाठी मला काही हरकत नाही, पण त्यांनी दिलेलं काम दर्जेदार असलं पाहिजे.”
त्यांच्या या वक्तव्याने राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. कारण अनेक ठिकाणी स्थानिक नेते आणि कंत्राटदार यांच्यातील संबंधांमुळे विकासकामांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होतात. अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे अशा व्यवहारांवर अप्रत्यक्ष टीका झाल्याचं स्पष्ट होतं.
ते पुढे म्हणाले की, “माझं मत नेहमीच स्पष्ट आहे — लोकांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. राजकारणात राहून लोकांची सेवा करणं म्हणजे विकासकामांच्या माध्यमातून लोकांना दिलासा देणं. पण जर राजकारणात येऊन कोणी फक्त कंत्राटं घेण्यासाठी स्पर्धा करत असेल, तर त्या प्रवृत्तीला मी प्रोत्साहन देणार नाही.”
अजित पवार यांनी विकासकामांच्या दर्जाबाबत प्रशासनालाही सूचना दिल्या. “कामं झाली की त्यांचं परीक्षण करा. दर्जा कमी असेल तर संबंधितांवर कारवाई करा. कारण लोकांचा पैसा यात खर्च होतो,” असं ते म्हणाले.
पिंपळी ग्रामपंचायत इमारतीच्या उद्घाटनावेळी अजित पवार यांच्या या भाषणाने उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा विकासकामांमधील पारदर्शकता, जबाबदारी आणि राजकारणातील प्रामाणिकतेचा मुद्दा चर्चेत आला आहे.