मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हरचा हृदयस्पर्शी अनुभव; कॉल आला आणि थरथरले हात, नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
मुंबईतील टॅक्सी ड्रायव्हरचा हृदयस्पर्शी अनुभव; कॉल आला आणि थरथरले हात, नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
मुंबईतील एका टॅक्सी ड्रायव्हरचा भावनिक अनुभव सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवासादरम्यान आलेल्या कॉलमुळे ड्रायव्हरचे हात थरथरले, कारण त्याला मुलीच्या अपघाताची बातमी मिळाली होती.
सायली मेमाणे
पुणे १ नोव्हेंबर २०२५ : स्वप्नांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत दररोज लाखो लोक आपल्या कुटुंबासाठी, जगण्यासाठी, आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी झगडत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी संघर्ष असतोच — पण काही क्षण असे असतात, जे या संघर्षामागचं मानवी मन दाखवून देतात. असाच एक प्रसंग नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये मुंबईतील एका टॅक्सी ड्रायव्हरचा हृदयस्पर्शी अनुभव पाहून नेटकरीही भावुक झाले आहेत.
मेहुल आर. ठक्कर नावाच्या व्यक्तीने आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर (पूर्वीचं ट्विटर) एक पोस्ट शेअर करत हा प्रसंग सांगितला आहे. सोमवारी ते दादरच्या दिशेने एका काळ्या-पिवळ्या टॅक्सीत प्रवास करत होते. प्रवासादरम्यान अचानक टॅक्सी ड्रायव्हरला गावाहून फोन आला. कॉल आल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. हात थरथरत होते, आवाज थिजला होता. प्रवाशालाही काहीतरी गंभीर झाल्याची जाणीव झाली.
कॉलवरून त्याला समजलं की, त्याच्या मुलीचा अपघात झाला आहे. त्या क्षणी ड्रायव्हर पूर्णपणे हादरला. मेहुल ठक्कर यांनी त्याला टॅक्सी थांबवायला सांगितले. ड्रायव्हरने थरथरत्या हाताने आपल्या पत्नीला फोन करून तातडीने घटनास्थळी पोहोचण्यास सांगितलं. काही वेळाने पुन्हा फोन आला, आणि त्यावेळी समजलं की मुलीला गंभीर दुखापत नाही, तर हात फ्रॅक्चर झाल्याची शक्यता आहे. ही बातमी ऐकताच ड्रायव्हर थोडा शांत झाला, पण त्याच्या चेहऱ्यावरचा ताण कायम होता.
मेहुलने त्याला श्वास घेण्याचा आणि स्वतःला सावरण्याचा सल्ला दिला. त्या वेळी ड्रायव्हरने जे बोललं, ते प्रत्येकाचं मन हेलावणारं होतं. तो म्हणाला, “मला घरी जायला हवं, कारण कुटुंबाला माझी गरज आहे. पण जर मी गेलो, तर पुढील दहा दिवस काहीही कमवू शकणार नाही. आणि घरी पैशांचीही गरज आहे.” या शब्दांनी मेहुल ठक्करलाही भरून आलं. त्यांना जाणवलं की प्रत्येकाच्या संघर्षाची कहाणी वेगळी असते — पण काही लोकांचं आयुष्य इतकं कठीण असतं की, त्यांच्यासाठी एक दिवसाची सुट्टी म्हणजे महिन्याचं नुकसान ठरतं.
मेहुल ठक्कर यांनी पोस्टमध्ये लिहिलं, “आपण अनेकदा वर्क-लाईफ बॅलन्स, सुट्ट्या, रिमोट वर्क आणि मेंटल हेल्थ डे याबद्दल बोलतो. पण या देशात अजूनही असे लाखो लोक आहेत, ज्यांच्याकडे या गोष्टींचा पर्यायच नाही. ते रोज जगण्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, इतरांच्या सुखासाठी झगडत असतात.”
ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. अनेक युजर्सनी या टॅक्सी ड्रायव्हरच्या धैर्याला आणि परिस्थितीशी लढण्याच्या ताकदीला सलाम केला आहे. काहींनी लिहिलं की, “प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एक न सांगितलेला संघर्ष दडलेला असतो.” तर काहींनी म्हटलं, “ही फक्त एका टॅक्सी ड्रायव्हरची गोष्ट नाही, तर त्या भारताची कहाणी आहे जिथे रोज कोणी तरी आपल्या दुःखावर मात करून इतरांना सेवा देतो.”
हा प्रसंग पुन्हा एकदा दाखवतो की, मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात जगण्यासाठीची लढाई प्रत्येकासाठी वेगळी असते. पण या लढ्यातही माणुसकी, जबाबदारी, आणि प्रेम या भावना आजही जिवंत आहेत.