पुणे जिल्ह्यातील टाकळी हाजी येथे एका १६ वर्षीय मुलीचा बालविवाह करण्यात आला होता. सासरच्या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, नऊ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सायली मेमाणे
पुणे : 9 जून २०२५ : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या गावात नुकतीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या १६ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह पार पाडण्यात आल्याचे समोर आले असून, या विवाहानंतर पीडित मुलीला सासरी मानसिक त्रास सहन करावा लागल्याने तिने थेट पोलिसांकडे मदत मागितली आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये या मुलीचा विवाह तिच्या कुटुंबियांनी केला होता. विवाहासाठी तिच्या आई-वडिलांसह आत्याचा पुढाकार होता. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही विवाह लावण्यात आला. लग्नानंतर ती सासरी गेल्यानंतर पती, सासू आणि नणंदकडून तिला सतत त्रास दिला जात होता. हा त्रास इतका वाढला की पीडितेला अखेर पोलिसांत धाव घ्यावी लागली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एकूण ९ जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सदर प्रकरणामुळे ग्रामीण भागात अजूनही बालविवाहासारख्या चुकीच्या प्रथांचा प्रभाव असल्याचे दिसून येते. अशा घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी सामाजिक जाणीव, शिक्षण आणि कडक कायद्यान्वयनाची आवश्यकता आहे.