पुणे महापालिकेची प्रभागरचना ठरली; भाजपला सर्वाधिक फायदा, ७० ते ८० हजार मतदारांचा एक प्रभाग
पुणे महापालिकेची नवी प्रभागरचना आणि संभाव्य निवडणूक यंत्रणा
पुणे महापालिकेची नवी प्रभागरचना जाहीर; १६५ नगरसेवक, ३९ चार सदस्यीय व ३ तीन सदस्यीय प्रभागांची योजना. भाजपला होणार फायदा, निवडणुकीचा मार्ग मोकळा.
सायली मेमाणे
पुणे ११ जून २०२५ : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचनेचा नारळ अखेर फुटला असून, राज्य सरकारने २९ महानगरपालिकांसाठी चार सदस्यीय प्रभागरचना करण्याचे आदेश सर्व आयुक्तांना दिले आहेत. या निर्णयानुसार मुंबई वगळता उर्वरित महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग असतील. पुणे महापालिकेसाठी यामुळे १६५ नगरसेवकांची संख्या निश्चित होणार असून, त्यात ३९ प्रभाग हे चार सदस्यीय तर ३ प्रभाग हे तीन सदस्यीय असतील. २०११ च्या जनगणनेनुसार ३४ लाख ८१ हजार लोकसंख्या गृहीत धरून हा आकडा निश्चित करण्यात आला आहे. ३० लाख लोकसंख्येसाठी १६१ नगरसेवक व त्यापुढे प्रत्येक एक लाखासाठी एक नगरसेवक हे सूत्र लागू करण्यात आले आहे. प्रभागरचनेनुसार एक प्रभाग सुमारे ७० ते ८० हजार मतदारांपर्यंत मर्यादित राहणार आहे.
या रचनेत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक फायदा होणार असल्याची चर्चा आहे. कारण २०१७ मध्ये याच चार सदस्यीय प्रभागरचनेत भाजपने पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता मिळवली होती. त्यामुळेच सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली याच प्रकारची रचना कायम ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. यासोबतच २०१७च्या निवडणुकीत समाविष्ट गावांचा प्रभागांमध्ये समावेश करताना मोठे फेरबदल करण्यात आले होते आणि या वेळेसही त्याच धरतीवरच रचना केली जात असल्याचे महापालिकेच्या वर्तुळात बोलले जात आहे.
पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपली असून, त्यानंतर प्रशासक नियुक्त आहे. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे प्रभागरचना, आरक्षण आणि मतदार यादी विभाजन यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने काही सत्ताधारी नेत्यांकडून प्रारूप आराखड्यालाही स्वरूप देण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने किती सदस्यीय प्रभाग असावा याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत आणि यासंदर्भातील याचिकाही प्रलंबित आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बाबतीत ३४ ते ३५ प्रभागांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २०१७ मध्ये १२८ नगरसेवक आणि ३२ प्रभाग असलेली संरचना होती. आता लोकसंख्येच्या वाढीमुळे नगरसेवकांची संख्या १३९ करण्यात आली आहे. त्यामुळे ३४ प्रभाग चार सदस्यीय (१३६ सदस्य) आणि १ प्रभाग तीन सदस्यीय अशी शक्य रचना असू शकते. विशेष म्हणजे, २०१७ मध्ये समाविष्ट ११ व २०२१ मध्ये समाविष्ट २३ गावांपैकी फुरसुंगी आणि उरुळी देवाची वगळून उर्वरित गावांचा समावेश जुन्या प्रभागांमध्ये करण्यात येत असल्याचे संकेत आहेत.
शहराच्या विविध भागांमध्ये भाजपच्या पारंपरिक मजबूत प्रभागांमध्येही फेररचना होणार असल्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, प्रभाग क्रमांक १५ जो शिवाजी रस्ता भागात येतो, तो पूर्वेकडे हलवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. अशा बदलांमुळे विरोधकांचे बालेकिल्ले कमकुवत करण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. पर्वती, कोथरूड, सातारा रस्ता, वडगाव शेरी आणि हडपसरसारख्या भागांमध्येही अशा फेरबदलांची चर्चा रंगली आहे.
प्रभागरचना हे महापालिका प्रशासनासाठी अत्यंत क्लिष्ट व राजकीयदृष्ट्या संवेदनशील काम मानले जाते. सत्ताधाऱ्यांना अनुकूल रचना करताना विरोधकांनाही सामावून घेण्याचे आव्हान असते. यंदा निवडणुका अनेक महिने रखडल्याने प्रशासन अधिक वेगाने ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. राज्य शासनाने अद्याप या प्रभागरचनेसाठी कालमर्यादा ठरवलेली नसली, तरी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चार महिन्यांच्या मर्यादेत निवडणुका घेणं अवघड असल्याने त्या दोन ते तीन टप्प्यांत घेण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळा, त्यानंतर येणाऱ्या सणवारांचा विचार करता निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.