बालेवाडी लैंगिक अत्याचार प्रकरण: प्रशिक्षकास तीन वर्षांची सक्तमजुरी

0
बालेवाडी लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा

बालेवाडी लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा

बालेवाडीतील नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात अल्पवयीन मुलीवर अश्लील कृत्य करणाऱ्या प्रशिक्षकाला न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी सुनावली.

सायली मेमाणे

पुणे/बालेवाडी ११ जून २०२५ : बालेवाडी लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी आढळलेल्या प्रशिक्षकाला पुण्यातील न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरी आणि सात हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. बालेवाडी येथील एका नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असलेल्या १२ वर्षीय मुलीवर प्रशिक्षकाने केलेल्या अश्लील वर्तनाची घटना २०१९ मध्ये उघडकीस आली होती.

या प्रकरणात दोषी ठरलेल्याचे नाव रुद्रगौडा चनवीरगौडा पाटील (वय २८, रा. पाषाण, पुणे; मूळ रा. बेळगाव, कर्नाटक) असे आहे. त्याच्यावर पॉक्सो कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. विशेष न्यायाधीश आर. एन. हिवसे यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. जर आरोपीने ठोठावलेला दंड भरला नाही, तर त्याला अतिरिक्त दोन महिने कारावास भोगावा लागेल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले.

या प्रकरणाची सुरुवात पीडित विद्यार्थिनीने घडलेली घटना घरी सांगितल्यापासून झाली. तिच्या कुटुंबीयांनी संस्थेकडे तक्रार केली असता, तिथून योग्य ती कारवाई न झाल्याने पीडितेच्या आजीने थेट हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला.

या खटल्यामध्ये सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी बाजू मांडली. फिर्यादींकडून ॲड. पुष्कर पाटील आणि ॲड. मयूर धाटावकर यांनी काम पाहिले. एकूण सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यामध्ये पीडित विद्यार्थिनी व संस्थेतील अधिकाऱ्यांच्या जबाबांना विशेष महत्त्व देण्यात आले.

प्रकरणाच्या सुनावणीत न्यायालयाने बचाव पक्षाचे युक्तिवाद ऐकून घेतले, मात्र उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. या निर्णयामुळे पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळाला असून, न्यायव्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर पुनःश्च विश्वास बसल्याचे मत व्यक्त होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed