साताऱ्यात लॉटरीच्या नावाखाली फसवणूक! उत्तर भारतीय टोळीचा भांडाफोड; मराठी नागरिकांना लक्ष्य
साताऱ्यात लॉटरीच्या नावाखाली फसवणूक! उत्तर भारतीय टोळीचा भांडाफोड; मराठी नागरिकांना लक्ष्य
साताऱ्यात पाटण तालुक्यात लॉटरीच्या नावाखाली तीन जणांकडून नागरिकांची फसवणूक; स्थानिक युवक राहुल शेडगे यांनी व्हिडिओ काढून भांडाफोड केली.
पुणे ०३ डिसेंबर २०२५ : साताऱ्यातील पाटण तालुक्यातून लॉटरीच्या नावाखाली फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेश पासिंगच्या दुचाकींवरून फिरणाऱ्या तीन व्यक्तींनी गावागावात जाऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे एका वायरल व्हिडिओमधून उघड झाले आहे. स्थानिक युवक राहुल शेडगे यांनी यांचा संशय आल्याने व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आणि काही तासांतच तो लाखो लोकांपर्यंत पोहोचला. आतापर्यंत 60 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून 2 लाख 35 हजारांपेक्षा जास्त लोकांनी त्याला लाईक केले आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, तिघे जण आपल्या दुचाकींवरून विविध गावांत फिरत नागरिकांना 200 रुपयांचे कुपन विकत आहेत. त्यांनी कुपन स्कीमच्या माध्यमातून फ्रीज, टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन यांसारखी महागडी बक्षिसे मिळतील, असा दावा करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला. चौकशीसाठी थांबवले असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. स्वतःचा व्यवसाय समजावून सांगताना तिघांमध्ये परस्परविरोधी माहिती दिसून आली. त्यांच्या बाईक्स उत्तर प्रदेश पासिंगच्या असल्याने संशय अधिकच वाढला.
राहुल शेडगे यांनी त्यांना लॉटरीतील वस्तू कुठे आहेत असा प्रश्न विचारला असता, त्यांनी त्या पाटणमधील एका गोडाऊनमध्ये असल्याचे सांगितले. मात्र ‘चलो, आम्ही गोडाऊन पाहायला येतो’ असे सांगताच त्यांनी लगेच आपली माहिती बदलून ‘आमचे गोडाऊन कोल्हापूरला आहे’ असे सांगितले. या विरोधाभासी उत्तरांमुळे त्यांची फसवणूक स्पष्ट झाली. यानंतर राहुल यांनी त्यांच्या हातातील कुपन स्क्रॅच करून दाखवण्यास सांगितले. स्क्रॅच केल्यावर फक्त एकच छोटासा गिफ्ट निघत असल्याचे दिसले. प्रत्यक्षात कुपनद्वारे महागडी बक्षिसे मिळतील, हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे यावरून सिद्ध झाले.
या फसवणूक पद्धतीत ते नागरिकांना ‘मोठे बक्षीस मिळेल’ असे सांगून कुपन घेण्यास प्रवृत्त करत होते. मात्र, सर्व स्क्रॅच कार्ड एकाच प्रकारचे ‘छोटे गिफ्ट’ देणारे असल्याने ते लॉटरीच्या नावाखाली पद्धतशीर फसवणूक करत असल्याचे उघड झाले. व्हिडिओमध्ये राहुल शेडगे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, बाहेरून आलेले हे लोक व्यवसायांच्या नावाखाली मराठी लोकांची फसवणूक करत आहेत. त्यांनी तिघांवर कठोर पोलीस कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि स्थानिकांना अशा आमिषांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, या व्हिडिओच्या वायरल झाल्यानंतर पाटण परिसरात नागरिकांमध्ये सावधगिरी वाढली आहे. लोकांना अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या ऑफरवर विश्वास ठेवू नये आणि अशा प्रकारची कोणतीही संशयित हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. या घटनेमुळे गावागावात फिरून लॉटरी, गिफ्ट योजना किंवा स्किम्सच्या नावाखाली होणारी फसवणूक किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
नागरिकांनी जागरूक राहून अशा फसवणूकप्रकारांना बळी न पडणे आवश्यक आहे. तसेच स्थानिक पोलिसांकडूनही या प्रकारावर लक्ष ठेवण्याची मागणी होत आहे. पाटण तालुक्यात घडलेल्या या घटनेने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली असून, अशा प्रकारच्या अन्य टोळ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information