महाराष्ट्रात पावसाची पुनरागमन: कोकणात रेड अलर्ट, मराठवाडा-विदर्भात उष्णतेचा इशारा

0
महाराष्ट्रात पावसाची पुनरागमन

महाराष्ट्रात पावसाची पुनरागमन

महाराष्ट्रात पावसाची पुनरागमन सुरू झाली असून कोकणात रेड अलर्ट, मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट आणि विदर्भात उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.

सायली मेमाणे

महाराष्ट्र १३ जून २०२५ : महाराष्ट्रात पावसाची पुनरागमन अखेर झाली असून कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सुरुवातीच्या सरींनंतर आलेल्या कोरड्या खंडानं राज्यात तापमानात मोठी वाढ झाली होती. नागरिकांबरोबरच पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनाही यामुळे चिंता वाढली होती. मात्र हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी स्थिती निर्माण झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. कोकण आणि मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, बीड, धाराशिव, पालघर यांसारख्या भागांमध्ये यलो अलर्ट जारी करून हलक्या ते मध्यम सरींचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढणार आहे.

कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या भागांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असून त्यामुळे तापमानात घट होईल आणि शेतीसाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल. पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद या भागांमध्ये १३ ते १६ जून दरम्यान सरी पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात मात्र उष्णतेचा जोर कायम आहे. नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची नोंद झाली असली तरी तापमान ४० ते ४२ अंश सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णाघात होण्याचा धोका असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मराठवाड्यात लातूर, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा जोर काहीसा कमी झाला आहे. इथंही हलक्या सरींची शक्यता असून त्यामुळे तापमानात थोडीशी घट होईल. मुंबईत ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाच्या सरी पडत आहेत. तापमान २८ ते ३२ अंश सेल्सियस दरम्यान राहणार आहे.

शेतकऱ्यांसाठी ही स्थिती काहीशी दिलासादायक आहे. लांबलेल्या कोरड्या हवामानामुळे खरीप पिकांची पेरणी खोळंबली होती. आता पावसाच्या पुनरागमनामुळे पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे. मात्र विदर्भात उष्णतेमुळे अजूनही धोका कायम असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed