अहमदाबाद विमान अपघातानंतर महेंद्रसिंग धोनी ट्रोल; अंबानींच्या कार्यक्रमातील हजेरीवरून संताप

0
अहमदाबाद विमान अपघातानंतर महेंद्रसिंग धोनी ट्रोल

अहमदाबाद विमान अपघातानंतर महेंद्रसिंग धोनी ट्रोल

अहमदाबाद विमान अपघातानंतर महेंद्रसिंग धोनी ट्रोल; चाहत्यांचा संताप सोशल मीडियावर व्यक्त, अंबानींच्या कार्यक्रमातील व्हिडिओमुळे वाढला आक्रोश

सायली मेमाणे

अहमदाबाद १३ जून २०२५ : अहमदाबाद येथे लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत २४१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असतानाच सोशल मीडियावर एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले – भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ट्रोल होऊ लागला आहे. या ट्रोलिंगमागील कारण म्हणजे धोनीने या दुर्घटनेबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करणे आणि त्याचवेळी अंबानी यांच्या लग्नसोहळ्यात सहभागी होताना त्याचे व्हिडिओ व्हायरल होणे.

संपूर्ण देश शोकमग्न असताना अनेक क्रिकेटपटूंनी – रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह – आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. मात्र, धोनीकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. यावरून अनेक चाहत्यांनी संताप व्यक्त करत धोनीला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. त्यांनी असे प्रश्न उपस्थित केले की, देशातील मोठ्या दुर्घटनेवर मौन बाळगणारा धोनी मात्र प्रसिद्ध उद्योगपतींच्या लग्नात मात्र उपस्थित राहतो व त्याबाबत पोस्ट करतो.

काही वापरकर्त्यांनी लिहिले की, “देशवासीयांविषयी प्रेम दाखवणारा धोनी अशा प्रसंगी का शांत राहतो?” तर काहींनी अंबानींच्या लग्नात सहभागी झाल्याचे धोनीचे व्हिडिओ दाखवत त्याच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, सोशल मीडियावर काही चाहत्यांनी धोनीची बाजूही घेतली. त्यांनी सांगितले की, धोनी नेहमीच व्यक्तिशः गोष्टी हाताळतो. तो आयपीएल जिंकल्यावरही पोस्ट करत नाही, आयसीसी पुरस्कार मिळाल्यावरही शांत राहतो. त्यामुळे त्याच्या शोक व्यक्त करण्याची शैली वेगळी असू शकते.

धोनीचा स्वभाव शांत आणि एकांतप्रिय असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. तो आयपीएल व्यतिरिक्त फार कमी वेळा जनतेसमोर येतो. सध्या तो आपल्या फार्महाऊसवर असतो, सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. त्यामुळे अनेकदा त्याला बाहेरच्या घडामोडींची त्वरित माहिती मिळत नसते. काहींनी यावर म्हणले की, भावना व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पोस्ट नव्हे. कदाचित धोनीने आपल्याच पद्धतीने या घटनेविषयी शोक व्यक्त केला असेल.

तरीही, सोशल मीडियावर महेंद्रसिंग धोनी ट्रोल केल्या जाण्याचे प्रमाण वाढत आहे. काहींनी याला गैरसमज तर काहींनी भावना विसरण्याचे लक्षण म्हटले आहे. एकंदरीत, देशात घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने एकीकडे शोक व्यक्त केला जात असताना दुसरीकडे धोनीप्रती नाराजीचा सूर उमटताना दिसतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *