पिंपरी-चिंचवडमध्ये प्रदूषणाचा विळखा: वाकड-हिंजवडीत हवा धोकादायक पातळीवर
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रदूषणाचा विळखा: वाकड-हिंजवडीत हवा धोकादायक पातळीवर
पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या गृहप्रकल्पांमुळे हवेची गुणवत्ता घसरली आहे. वाकड व हिंजवडी भागात AQI 232 वर पोहोचला असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
पुणे ३० डिसेंबर २०२५ : पिंपरी-चिंचवड शहर आणि लगतच्या उपनगरांमध्ये सध्या सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील गृहप्रकल्पांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाकड, हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात बांधकामांमधून उडणारी धूळ, राडारोडा आणि सिमेंट कण यामुळे हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) रविवारी 232 वर पोहोचला असून, ही पातळी आरोग्यासाठी धोकादायक मानली जाते.
विशेषतः वाकड आणि हिंजवडी परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसून येत आहे. वाकडमधील भूमकरनगर परिसरात रविवारी दुपारी हवेची गुणवत्ता ‘अतिखराब’ श्रेणीत नोंदवण्यात आली. येथील हवेत सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण (PM 2.5) तब्बल 307 पर्यंत पोहोचले असून, हे प्रमाण मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. डॉक्टरांच्या मते, अशा हवेमुळे श्वसनाचे विकार, दमा, फुफ्फुसांचे आजार तसेच डोळे व त्वचेच्या समस्यांचा धोका वाढतो.
वाकड आणि हिंजवडी परिसरात सुरू असलेल्या असंख्य गृहप्रकल्पांना साहित्याचा पुरवठा करणारे अनेक रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पांमधून उडणारी सिमेंटची धूळ, वाळू आणि खडीची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे परिसरात सतत धुळीचे लोट पसरलेले दिसतात. अनेक ठिकाणी प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न करता हे प्रकल्प सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या कामांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील हवा गेल्या काही आठवड्यांपासून ‘मध्यम’ ते ‘खराब’ या श्रेणीतच फिरत आहे. वाढती वाहनसंख्या, अपूर्ण रस्ते, बांधकाम साहित्याची खुलेआम वाहतूक आणि कचरा जाळण्याच्या घटनांमुळे प्रदूषणात भर पडत आहे. असे असतानाही पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रभावी उपाययोजना राबविल्या जात नसल्याचा आरोप पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
पुणे शहरासाठी तयार करण्यात आलेल्या ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ अंतर्गत हवेची गुणवत्ता मध्यम किंवा खराब पातळीवर गेल्यास तातडीने काही ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे. यामध्ये बांधकाम स्थळांवरील धूळ नियंत्रण, कचरा जाळण्यावर कडक बंदी, नियम न पाळणाऱ्या प्रकल्पांवर कारवाई, तसेच वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा समावेश आहे. मात्र प्रत्यक्षात या उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे चित्र आहे.
प्रदूषणाचा हा वाढता धोका लक्षात घेता, नागरिकांमध्येही चिंता वाढली आहे. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणे कठीण झाले असून, लहान मुले, वृद्ध आणि श्वसन विकार असलेल्या रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिकच गंभीर ठरत आहे. वेळेत कठोर पावले उचलली नाहीत, तर येत्या काळात पिंपरी-चिंचवड शहराला प्रदूषणाच्या आणखी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information