FASTag Rules 2026: टोल नाक्यावरून सुसाट जा; KYV प्रक्रिया रद्द, NHAI चा मोठा निर्णय
FASTag Rules 2026: टोल नाक्यावरून सुसाट जा; KYV प्रक्रिया रद्द, NHAI चा मोठा निर्णय
Fastag Rules 2026: NHAI ने 1 फेब्रुवारी 2026 पासून फास्टॅगसाठी KYV प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे टोलवरील रांगा कमी होऊन वाहनचालकांचा वेळ वाचणार आहे.
पुणे २ जानेवारी २०२६ : नवीन वर्षाची सुरुवात होताच केंद्र सरकारकडून विविध क्षेत्रांतील नियमांमध्ये बदल केले जात असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर होत आहे. वाहनचालकांसाठी दिलासादायक ठरणारा असाच एक महत्त्वाचा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. फास्टॅग संदर्भातील केवायव्ही म्हणजेच ‘नो युअर व्हेईकल’ प्रक्रिया 1 फेब्रुवारी 2026 पासून रद्द करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा एनएचएआयकडून करण्यात आली आहे.
फास्टॅगचा वापर देशभरातील टोल प्लाझांवर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, केवायव्ही अपडेट, कागदपत्रांची पडताळणी आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक वेळा वाहनचालकांना टोल नाक्यांवर अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. विशेषतः केवायव्ही अपडेट न केल्याच्या कारणावरून फास्टॅग ब्लॅकलिस्ट किंवा निष्क्रिय झाल्याने टोल प्लाझांवर लांबच लांब रांगा लागल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
हीच अडचण लक्षात घेऊन एनएचएआयने फास्टॅग नियमांमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारी 2026 नंतर नवीन कारसाठी जारी होणाऱ्या फास्टॅगसाठी वेगळी केवायव्ही प्रक्रिया आवश्यक राहणार नाही. आता फास्टॅग जारी करण्यापूर्वी वाहनांची सर्व माहिती थेट VAHAN डेटाबेसच्या माध्यमातून पडताळली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक होणार आहे.
एनएचएआयने स्पष्ट केले आहे की ज्या वाहन मालकांकडे आधीपासून सक्रिय फास्टॅग आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचे नवीन केवायव्ही अपडेट करण्याची गरज नाही. यामुळे लाखो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केवायव्ही किंवा अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता आता केवळ विशिष्ट प्रकरणांमध्येच भासणार आहे. उदाहरणार्थ, फास्टॅगचा गैरवापर, चुकीच्या पद्धतीने जारी करण्यात आलेले टॅग किंवा बनावट फास्टॅगविषयी तक्रार आल्यासच तपासणी केली जाईल.
दरम्यान, “एक वाहन, एक फास्टॅग” हा नियम अधिक कडकपणे राबवण्यात येणार असल्याचेही एनएचएआयने स्पष्ट केले आहे. एका फास्टॅगचा वापर अनेक वाहनांसाठी केला जात असल्याचे प्रकार रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. यामुळे टोल वसुली अधिक अचूक होण्यास मदत होईल, तसेच गैरप्रकारांवरही आळा बसणार आहे.
एनएचएआयच्या मते, या निर्णयामागील मुख्य उद्देश म्हणजे टोल प्लाझांवरील वाहतूक सुरळीत ठेवणे आणि प्रवाशांचा वेळ वाचवणे. केवायव्ही प्रक्रियेमुळे होणारा अनावश्यक त्रास कमी होणार असून, वाहनचालक आता टोल नाक्यावरून अधिक वेगाने आणि अडथळ्यांशिवाय प्रवास करू शकतील. विशेषतः महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
एकंदरीतच, फास्टॅग नियमांमधील हा बदल वाहनचालकांसाठी दिलासादायक ठरणार असून, टोल व्यवस्थेतील अडथळे कमी करण्यास मदत करणार आहे. 2026 पासून लागू होणाऱ्या या नव्या नियमांमुळे टोल नाक्यांवरील अनुभव अधिक सोपा आणि वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information