Greta Karpe: सांगलीच्या ग्रेटाचा राज्यात डंका! अवघ्या सहा वर्षांत राज्यस्तरीय मार्शल आर्ट्स स्पर्धेत सुवर्णपदक
Greta Karpe: सांगलीच्या ग्रेटाचा राज्यात डंका! अवघ्या सहा वर्षांत राज्यस्तरीय मार्शल आर्ट्स स्पर्धेत सुवर्णपदक
सांगलीची चिमुरडी ग्रेटा महेश कर्पे हिने राज्यस्तरीय शस्त्रांग मार्शल आर्ट्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
पुणे ९ जानेवारी २०२६ : सांगली जिल्ह्यातील अवघ्या सहा वर्षांच्या ग्रेटा महेश कर्पे हिने आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा स्टेडियममध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय शस्त्रांग मार्शल आर्ट्स स्पर्धेत ग्रेटाने सुवर्णपदक पटकावून दैदीप्यमान यश संपादन केले. तिच्या या कामगिरीमुळे ती आता राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवडली गेली असून, सांगलीसह मूळ गाव आंबोलीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ग्रेटा ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली (बाजारवाडी) येथील असून सध्या सांगली येथे वास्तव्यास आहे. ती महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, पुणे यांच्या सांगलीतील बालक मंदिर शाळेत मोठ्या गटात शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच स्वसंरक्षणाचे धडे गिरवावेत, अशी तिचे वडील महेश कर्पे आणि आई स्वाती कर्पे यांची इच्छा होती. त्यामुळे ग्रेटाला पाच वर्षे पूर्ण होताच त्यांनी कराटेचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला.
घराच्या जवळच जिद्द स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या कराटे क्लासची माहिती मिळाल्यानंतर मे 2025 मध्ये ग्रेटाचे तिथे प्रवेश करण्यात आला. प्रशिक्षक प्रथमेश लोंढे आणि काजल लोंढे यांनी सुरुवातीपासूनच ग्रेटाच्या कौशल्याकडे लक्ष दिले. अल्पावधीतच तिची प्रगती पाहून तिला विविध स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय प्रशिक्षकांनी घेतला.
ग्रेटाने सुरुवातीला 4थ्या इन्व्हिटेशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेत काता प्रकारात रौप्यपदक आणि कुमिथेमध्ये कांस्यपदक पटकावले. त्यानंतर सांगली जिल्हास्तरीय प्रथम शस्त्रांग मार्शल आर्ट्स स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळवले. या यशामुळे तिचा आत्मविश्वास अधिक वाढला आणि प्रशिक्षकांनी तिला थेट राज्यस्तरीय स्पर्धेत उतरवण्याचा निर्णय घेतला.
छत्रपती संभाजीनगर येथे 3 आणि 4 जानेवारी रोजी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत ‘एअर शिल्ड गर्ल्स’ गटात ग्रेटाने अत्यंत आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर केला. तिच्या अचूक हालचाली, शिस्तबद्ध तंत्र आणि आत्मविश्वासामुळे तिने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाला गवसणी घातली. अवघ्या सहा वर्षांच्या वयात मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
या यशाबद्दल ग्रेटाचा शाळेत विशेष सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका स्मिता जोशी आणि वर्गशिक्षिका शीतल जवळेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले. तसेच जिद्द स्पोर्ट्स फाऊंडेशनचे पदाधिकारी, प्रशिक्षक आणि आंबोली ग्रामस्थांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ग्रेटाच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे की, सुरुवातीला केवळ स्वसंरक्षण शिकावे इतकीच अपेक्षा होती. मात्र प्रशिक्षकांचा विश्वास, सातत्यपूर्ण सराव आणि ग्रेटाची मेहनत यामुळे आज ती राज्यस्तरावर चमकली आहे. भविष्यात तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे नाव उज्ज्वल करावे, अशी सर्वांची अपेक्षा आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information