पुण्यासाठी मोफत मेट्रो, मोफत बस सेवा; राष्ट्रवादीचे मोठे वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी आश्वासन
पुण्यासाठी मोफत मेट्रो, मोफत बस सेवा; राष्ट्रवादीचे मोठे वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी आश्वासन
राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यासाठी मोफत मेट्रो व मोफत बस सेवेचे आश्वासन देण्यात आले आहे. ३३ मिसिंग लिंक, १५ मुख्य रस्ते आणि HCMTRसह मोठे कनेक्टिव्हिटी प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचा दावा करण्यात आला आहे.
पुणे १० जानेवारी २०२६ : पुणे शहरातील वाहतूक कोंडी, वाढती लोकसंख्या आणि अपुरी कनेक्टिव्हिटी या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणेकरांसाठी महत्त्वाची आश्वासने जाहीर केली आहेत. पुण्यासाठी मोफत मेट्रो सेवा आणि मोफत बस सेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर करत, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचा निर्धार पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास खर्च कमी होण्यासोबतच खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे.
यासोबतच पुणे शहरातील ३३ मिसिंग लिंक आणि १५ प्रमुख रस्त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सुमारे १५० किलोमीटरहून अधिक लांबीच्या या रस्त्यांमुळे शहराच्या विविध भागांमधील संपर्क अधिक सुलभ होणार असून, पुणेकरांना कुठेही पोहोचणे अधिक सोपे होईल, असे सांगण्यात आले आहे. सध्या अपूर्ण असलेल्या किंवा अरुंद, खराब अवस्थेतील रस्त्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
पुढील दोन वर्षांच्या कालावधीत शहरातील महत्त्वाचे कनेक्टिव्हिटी प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धारही जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये बाणेर-पाषाण लिंक रोड आणि कात्रज-कोंढवा रोड हे दोन्ही रस्ते सहा महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय बालभारती-पौड रोड, लोकमत-सावित्री गार्डन (धायरी) रोड, तसेच भुगाव-वारजे-नांदेड सिटी-नन्हे-जांभुळवाडी रोडचा समावेश असलेल्या PMRDA अंतर्गत इंटरनल रिंग रोड प्रकल्पाचाही यात समावेश आहे.
पूर्व पुण्यातील वाहतूक समस्या लक्षात घेऊन वाघोली-लोहगाव लिंक रोड, बकोरी फाटा-बकोरी रोड, वाघोली-नगर रोड बायपास आणि आयव्ही इस्टेट रोड (वाघोली) यांसारख्या रस्त्यांच्या विकासाचेही आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय खाडी मशीन चौक-वडकी रोड, VIT कॉलेज-कोंढवा रोड आणि वाकड-कात्रज सर्विस रोड (पुणे-सातारा हायवे) यांसारख्या मार्गांमुळे शहराच्या पश्चिम, दक्षिण आणि पूर्व भागांतील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.
महत्त्वाकांक्षी ३६ किलोमीटर लांबीच्या हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रोड (HCMTR) प्रकल्पालाही या योजनेत विशेष स्थान देण्यात आले आहे. पुणे शहराचा इंटरनल रिंग रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक भार मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा दावा करण्यात आला आहे. मोफत सार्वजनिक वाहतूक सेवा आणि व्यापक रस्ते विकास प्रकल्पांच्या माध्यमातून पुण्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा हा आराखडा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information