पुण्यात नायलॉन मांजाची सर्रास विक्री; बंदी असूनही नागरिक व पक्ष्यांचा जीव धोक्यात
पुण्यात नायलॉन मांजाची सर्रास विक्री; बंदी असूनही नागरिक व पक्ष्यांचा जीव धोक्यात
पुणे शहरात नायलॉन (चिनी) मांजावर बंदी असूनही मकरसंक्रांतीदरम्यान त्याची छुप्या मार्गाने विक्री सुरू आहे. या जीवघेण्या मांजामुळे नागरिक अपघातग्रस्त होत असून पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
पुणे १० जानेवारी २०२६ : पुणे शहरात जानेवारी महिन्यात मकरसंक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवण्याचा उत्साह शिगेला पोहोचतो. आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून जाते आणि गल्लीबोळांत कापाकापीचा जल्लोष पाहायला मिळतो. मात्र या उत्साहामागे एक भयावह वास्तव लपलेले आहे. बंदी असलेला नायलॉन म्हणजेच चिनी मांजा आजही पुण्यात सर्रास वापरला जात असून तो नागरिक, प्राणी आणि विशेषतः पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. शासनाने स्पष्ट बंदी घातलेली असतानाही या मांजाची छुप्या मार्गाने विक्री आणि वापर सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
गेल्या आठवडाभरात पुण्यात नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी दुचाकीस्वारांच्या मानेला, हातांना आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर कात्रज, धनकवडी, कोंढवा, लष्कर, पर्वती तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात पाहणी केली असता, लहान मुलांपासून तरुणांपर्यंत अनेकजण निर्भयपणे नायलॉन मांजाचा वापर करत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
संवाद साधताना अनेक तरुणांनी कबुली दिली की सुती मांजाच्या तुलनेत नायलॉन मांजा अधिक धारदार असल्याने पतंग पटकन कापली जाते. स्पर्धा जिंकण्यासाठीच हा मांजा वापरला जातो. बंदीची पूर्ण माहिती असूनही साधारण एक हजार रुपयांपर्यंत खर्च करून नायलॉन मांजाचे बंडल छुप्या मार्गाने खरेदी केले जात असल्याचेही समोर आले. पोलिस कारवाईची भीती असल्याने हा व्यवहार गुप्तपणे केला जातो, मात्र शहरातील अनेक गल्लीबोळांतील दुकानदारांकडे आजही हा घातक मांजा सहज उपलब्ध आहे.
पतंग उडविल्यानंतर उरलेला मांजा आणि कागद रस्त्यावर, झाडांवर आणि विद्युत तारांवर अडकून राहतो. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते. विजेच्या तारा, केबल आणि खांबांना अडकलेला नायलॉन मांजा वाहनचालकांसाठी मोठा धोका ठरत आहे. कावळे, कबुतरे, चिमण्या, घार, साळुंखी तसेच वटवाघळे या मांजामध्ये अडकून गंभीर जखमी होतात किंवा मृत्युमुखी पडतात. अनेक पक्ष्यांना कायमचे अपंगत्व येत असल्याचेही स्वयंसेवी संस्था सांगतात.
मानव, प्राणी आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने २०१७ साली नायलॉन मांजावर संपूर्ण बंदी घातली आहे. या बंदीचे उल्लंघन केल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंड आणि तीन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. मात्र पुण्यात या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्टपणे जाणवते. मकरसंक्रांतीच्या काळात कारवाईची घोषणा केली जाते, पण ती बहुतांशी कागदोपत्रीच मर्यादित राहते, असा आरोप नागरिक करत आहेत.
उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांवर ठोस कारवाई न झाल्यानेच नायलॉन मांजाची विक्री आणि वापर सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. माणसाच्या जिवाची किंमत काय, असा प्रश्न उपस्थित होत असून, बंदी असलेल्या या मांजावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पुणेकरांकडून होत आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information