HSRP Number Plate: जुन्या वाहनधारकांसाठी शेवटची संधी; १५ ऑगस्टनंतर होणार कारवाई

1
HSRP Number Plate: जुन्या वाहनधारकांसाठी शेवटची संधी

HSRP Number Plate: जुन्या वाहनधारकांसाठी शेवटची संधी

HSRP Number Plate न बसवलेल्या वाहनांवर १५ ऑगस्टनंतर कारवाई; राज्य सरकारकडून तिसरी आणि अंतिम मुदतवाढ.

सायली मेमाणे

१९ जून २०२५ : राज्यातील जुने वाहनधारक जर अजूनही आपल्या वाहनावर HSRP म्हणजेच उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी लावलेली नसेल, तर आता काळजी घेण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारने यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर आता तिसऱ्यांदा अंतिम संधी दिली असून, १ एप्रिल २०१९पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत HSRP बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या मुदतीनंतर HSRP न बसवलेल्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे वाहनधारकांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

माहितीनुसार, राज्यात सुमारे दोन कोटी जुनी वाहने आहेत. यापैकी केवळ २३ लाख वाहनांवर HSRP बसवले गेले असून, ४० लाखांहून अधिक वाहनधारकांनी या प्रक्रेसाठी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. याचा अर्थ अजूनही अंदाजे सव्वा कोटीहून अधिक जुनी वाहने HSRP च्या बाहेर आहेत. २०१९ नंतर खरेदी केलेल्या नव्या वाहनांवर डीलरच HSRP फिट करतात. मात्र जुन्या वाहनधारकांना अजूनही या सेवा मिळण्यात अडचणी येत असल्याची कबुली संबंधित यंत्रणांनी दिली आहे.

HSRP उपलब्ध करणाऱ्या अधिकृत कंपन्यांकडून पुरवठा अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने अनेक वेळा ग्राहकांनी नोंदणी केल्यानंतरही नंबर प्लेट मिळत नाही. अनेक फिटमेंट केंद्रेही बंद असल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून सरकारने संबंधित तीन कंपन्यांना मोठ्या प्रमाणात HSRP तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य वाहनचालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी स्पष्ट केले की सरकारकडून अंतिम मुदतवाढ दिली असली तरी ती संधी न गमावता नागरिकांनी तत्काळ नंबर प्लेट बसवावी. अन्यथा पोलीस किंवा RTO कारवाईच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

राज्यातील ६० प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये तीन विभागांमध्ये विभागली गेली असून, प्रत्येकीसाठी एक कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. यामध्ये मेसर्स रोजमर्टा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड, मेसर्स रियल मेजॉन इंडिया लिमिटेड आणि मेसर्स एफ टी ए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांना HSRP ची ऑन-डिमांड मागणी पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्य सरकारच्या या आदेशामुळे नागरिकांना कायदेशीर बंधनाची जाणीव करून दिली जात असून, वाहतुकीतील सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. अशा परिस्थितीत वाहनधारकांनी उशीर न करता अधिकृत वेबसाइटवरून HSRP साठी अर्ज करावा आणि सरकारी दंड व अडचणींपासून वाचावे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

1 thought on “HSRP Number Plate: जुन्या वाहनधारकांसाठी शेवटची संधी; १५ ऑगस्टनंतर होणार कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed