हैदराबादच्या ठगांकडून 35 पुणेकरांना साडेआठ कोटींचा गंडा; डॉक्टर, इंजिनिअर, व्यावसायिकांसह अनेकांची फसवणूक
पुणेकरांना साडेआठ कोटींचा गंडा; डॉक्टर, इंजिनिअर, व्यावसायिकांसह अनेकांची फसवणूक
मासिक 11-22% परताव्याचे आमिष; फाल्कन ग्रुपकडून 35 पुणेकरांकडून 8.54 कोटींची फसवणूक. गुन्हा दाखल, काही आरोपी अटकेत.
सायली मेमाणे
१२ जून २०२५ : पुणे शहरातील उच्चशिक्षित नागरिकांना आकर्षक परताव्याच्या आमिषाने सुमारे 8 कोटी 54 लाख रुपयांनी गंडवण्याचा प्रकार समोर आला असून, हैदराबाद येथील फाल्कन ग्रुप आणि कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांच्या माध्यमातून तब्बल 35 गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. यामध्ये डॉक्टर, आयटी अभियंते, उद्योजक आणि व्यावसायिकांचा समावेश आहे.
फिर्यादी डॉ. अंकुर संजयकुमार धोका यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, फाल्कन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अमरदीप कुमार, संचालक अनिता कुमारी, संदीप कुमार व अन्य कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणूक आणि महाराष्ट्र ठेवीदार वित्तीय संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कंपन्यांनी ‘इन्व्हॉइस डिस्काउंटिंग’ या संकल्पनेच्या नावाखाली गुंतवणुकीवर मासिक 11 ते 22 टक्के परताव्याचे प्रलोभन दिले होते. सुरुवातीला काही महिन्यांसाठी परतावा दिल्यानंतर अचानकच तो थांबवण्यात आला. जबाबदारी झटकत कंपनीने पैसे परत करण्यास तीन महिन्यांची मुदत मागितली होती. मात्र, तीही पूर्ण झाली तरी रक्कम परत करण्यात आली नाही.
फिर्यादी डॉ. धोका यांच्या मित्रांनी कंपनीच्या हैदराबादमधील कार्यालयात भेट दिली असता, तेथे कार्यालय बंद असल्याचे स्पष्ट झाले. पुढील चौकशीत उघडकीस आले की, या कंपनीवर हैदराबादमधील सायराबाद आर्थिक गुन्हे शाखेत 20 जणांविरुद्ध गुन्हा आधीच दाखल आहे. याशिवाय मुंबईमध्येही एक स्वतंत्र गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.
या प्रकरणात पुण्यातील कल्याणीनगर, रहाटणी, पिंपळे सौदागर, वाघोली, हडपसर, मांजरी, पाषाण, टिंगरेनगर अशा विविध परिसरांतील गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. अनेकांनी लाखो-कोटींमध्ये गुंतवणूक केली होती. आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानंतर नऊ गुंतवणूकदारांचे प्राथमिक जबाब नोंदवले गेले आहेत.
फसवणूक करणाऱ्या संस्थांतील काही आरोपींना हैदराबाद पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपींविरोधात शोध व चौकशी सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ यांनी सांगितले की, या प्रकरणात आणखी गुंतवणूकदारांनी पुढे येऊन तक्रारी कराव्यात, अशीही विनंती करण्यात आली आहे.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz
1 thought on “हैदराबादच्या ठगांकडून 35 पुणेकरांना साडेआठ कोटींचा गंडा; डॉक्टर, इंजिनिअर, व्यावसायिकांसह अनेकांची फसवणूक”