लातूरमध्ये तिकीट न मिळाल्याचा अजब निषेध; NCP आमदार संजय बनसोडेंच्या कार्यालयाबाहेर लघवी
लातूरमध्ये तिकीट न मिळाल्याचा अजब निषेध; NCP आमदार संजय बनसोडेंच्या कार्यालयाबाहेर लघवी
लातूर जिल्हा परिषद निवडणूक 2026 दरम्यान वडिलांना तिकीट न मिळाल्याने मुलाने NCP आमदार संजय बनसोडेंच्या कार्यालयाबाहेर लघवी करून निषेध नोंदवला, व्हिडीओ व्हायरल.
पुणे 22 जानेवारी २०२६ : लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच एक धक्कादायक आणि वादग्रस्त घटना समोर आली आहे. वडिलांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याच्या निषेधार्थ एका व्यक्तीने थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या लातूर शहरातील कार्यालयाबाहेर लघवी केल्याची घटना घडली आहे. बुधवारी, 21 जानेवारी 2026 रोजी घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना उदगीर तालुक्यातील निळेबन मतदारसंघाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले मधुकर एकुरकेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. या नाराजीचे टोक गाठत त्यांच्या मुलाने नितीन एकुरकेकर यांनी हा अजब आणि निषेधात्मक प्रकार केल्याचे समोर आले आहे.
नितीन एकुरकेकर यांनी पक्षनेतृत्वाने आपल्यावर आणि त्यांच्या वडिलांवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. अनेक वर्षे स्थानिक पातळीवर प्रामाणिकपणे काम करूनही पक्षाने उमेदवारी नाकारल्याने आपण संतप्त झालो असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संतापातूनच त्यांनी आमदार संजय बनसोडे यांच्या कार्यालयाबाहेर लघवी करून निषेध नोंदवला. या घटनेचा व्हिडीओ त्यांनी स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता, जो काही वेळातच व्हायरल झाला.
व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरल्यानंतर राजकीय वर्तुळात तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी या प्रकाराचा निषेध करत अशी कृती लोकशाही मार्गाला धरून नसल्याचे मत व्यक्त केले. वाद वाढल्यानंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, मधुकर एकुरकेकर यांच्या समर्थकांनी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. स्थानिक पातळीवर दीर्घकाळ काम करूनही नेतृत्वाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा समर्थकांकडून करण्यात येत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना यामागे असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी अडचणी वाढण्याची शक्यता असून विरोधकांकडूनही या प्रकरणावर टीका केली जात आहे. निवडणूक काळात अशा प्रकारचे निषेध पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे ठरू शकतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. लातूर जिल्ह्यातील या घटनेमुळे जिल्हा परिषद निवडणूक 2026 च्या प्रचारात आता हा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information