Nashik Crime: २ हजारांच्या जुन्या नोटा, ४०० कोटींचे कॅश कंटेनर लुटले? ३ राज्यांना हादरवणारे रहस्य उघड

Nashik Crime: २ हजारांच्या जुन्या नोटा, ४०० कोटींचे कॅश कंटेनर लुटले? ३ राज्यांना हादरवणारे रहस्य उघड
नाशिकमध्ये ४०० कोटी रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेले कंटेनर लुटल्याचा गंभीर आरोप; संदीप पाटील यांच्या अपहरणानंतर प्रकरणाला वेगळे वळण, SIT चौकशी सुरू.
पुणे 2४ जानेवारी २०२६ : नाशिक जिल्ह्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक गुन्हेगारी प्रकरणाने महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. २ हजार रुपयांच्या जुन्या नोटांनी भरलेले तब्बल ४०० कोटी रुपयांचे दोन कंटेनर लुटल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला असून, याच घटनेशी संबंधित तक्रारदार संदीप पाटील यांचे अपहरण आणि मारहाण झाल्याचा गंभीर दावा समोर आला आहे. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी गोव्यातून कर्नाटकच्या दिशेने जाणारे पैशांनी भरलेले दोन कंटेनर कर्नाटकातील चोरली घाट परिसरात लुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कंटेनरमध्ये २ हजार रुपयांच्या जुन्या नोटांमध्ये सुमारे ४०० कोटी रुपयांची रोख रक्कम होती, असा दावा तक्रारदार संदीप पाटील यांनी केला आहे. हा प्रकार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्याचे सांगितले जात असून, यामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर संदीप पाटील यांना सातत्याने फोनवरून धमक्या दिल्या जात होत्या. त्यांच्यावर या लुटीत सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत होता. याच दरम्यान मुंबई–आग्रा महामार्गावरून त्यांचे अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संदीप पाटील यांनी एका व्हिडीओद्वारे हे पैसे ठाण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक किशोर सावला यांच्याशी संबंधित असल्याचा दावा केल्याने या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.
विशेष बाब म्हणजे हे प्रकरण महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत पुढे आले आहे. ९ जानेवारी २०२६ रोजी या संदर्भात अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाची गंभीरता आणि व्याप्ती लक्षात घेता नाशिक ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या नेतृत्वाखाली ही SIT कार्यरत असून, सखोल तपास सुरू आहे.
आतापर्यंत या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी विराट गांधी या बांधकाम व्यावसायिकासह पाच आरोपींना अटक केली आहे. मात्र किशोर सावला आणि अझहर हे दोन प्रमुख आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत असून, आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे तपासले जात आहेत.
या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कंटेनरमध्ये नेमकी किती रक्कम होती, ही रक्कम कुणाची होती, ती कुठून कुठे नेली जात होती, इतकी मोठी रक्कम वाहतूक करताना पोलीस किंवा अन्य यंत्रणांना याची माहिती का नव्हती, तसेच या व्यवहारामागे कोणते राजकीय किंवा व्यावसायिक संबंध आहेत का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. SIT च्या तपासातून या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare