निवडणूक आयोगाला आली जाग; जि. प. निवडणुकांसाठी पुण्यात १४ हजार EVM, मतदानातील गोंधळ टाळण्यासाठी मोठा निर्णय

0
निवडणूक आयोगाला आली जाग; जि. प. निवडणुकांसाठी पुण्यात १४ हजार EVM, मतदानातील गोंधळ टाळण्यासाठी मोठा निर्णय

निवडणूक आयोगाला आली जाग; जि. प. निवडणुकांसाठी पुण्यात १४ हजार EVM, मतदानातील गोंधळ टाळण्यासाठी मोठा निर्णय

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी ३,६०५ मतदान केंद्रांवर १४ हजारांहून अधिक EVM आणि ५,८१३ कंट्रोल युनिट्स उपलब्ध; महापालिका निवडणुकीतील अनुभवातून निवडणूक आयोगाचा धडा.

पुणे 2५ जानेवारी २०२६ : पुणे जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने यावेळी विशेष खबरदारी घेतली असून, मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मतदानयंत्रांची संख्या थेट चारपटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकांदरम्यान अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम आणि कंट्रोल युनिट्स बंद पडल्याने मतदान थांबले होते. यामुळे मतदारांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर यंदा अशी पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीच ठोस पावले उचलली आहेत.

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांसाठी तब्बल १४ हजारांहून अधिक मतदानयंत्रे आणि ५ हजार ८१३ कंट्रोल युनिट्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यकतेपेक्षा अधिक यंत्रांचा साठा ठेवण्यात येणार आहे. एखादे यंत्र नादुरुस्त झाल्यास तात्काळ पर्यायी यंत्र उपलब्ध करून देण्यात येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

मागील महापालिका निवडणुकीत ईव्हीएम आणि कंट्रोल युनिट बंद पडण्याच्या शेकडो घटना घडल्या होत्या. अनेक मतदान केंद्रांवर अर्धा तास ते एक तास मतदान थांबले होते. काही ठिकाणी पर्यायी यंत्रे उशिरा पोहोचल्याने मतदारांच्या लांब रांगा लागल्या आणि सायंकाळनंतरही मतदान सुरू ठेवावे लागले होते. या प्रकारामुळे निवडणूक यंत्रणेवर टीका झाली होती. त्याच अनुभवातून धडा घेत निवडणूक आयोगाने यावेळी अतिरिक्त यंत्रांचा मोठा साठा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका निवडणुकीदरम्यान बंद पडलेली १,१९२ मतदानयंत्रे आणि ८१२ कंट्रोल युनिट्स सध्या जिल्हा प्रशासनाच्या भोसरी येथील गोदामात सीलबंद अवस्थेत ठेवण्यात आली आहेत. या यंत्रांचा वापर यंदाच्या निवडणुकीसाठी करण्यात येणार नाही. नव्या आणि कार्यक्षम यंत्रांद्वारेच मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तालुकानिहाय मतदान केंद्रांच्या संख्येतही फरक दिसून येतो. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इंदापूर तालुक्यात सर्वाधिक ४०० मतदान केंद्रे असून, तेथे १,६६४ मतदानयंत्रे आणि ६६० कंट्रोल युनिट्स देण्यात आली आहेत. तर वेल्हा तालुक्यात सर्वांत कमी १०५ मतदान केंद्रे असून, तेथे ४३७ मतदानयंत्रे आणि १७३ कंट्रोल युनिट्स उपलब्ध असणार आहेत. उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी सांगितले की, मागील निवडणुकांचा अनुभव लक्षात घेऊनच ही अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेसाठी १० आणि पंचायत समितीसाठी १२ उमेदवारांनी माघार घेतली आहे. २७ जानेवारी हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र २५ आणि २६ जानेवारी या सार्वजनिक सुट्ट्या असल्याने उमेदवारांना प्रत्यक्षात केवळ दोनच दिवस उपलब्ध आहेत. अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषदेसाठी ६११ आणि पंचायत समितीसाठी १,११० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले असून, अंतिम चित्र २७ जानेवारीनंतर स्पष्ट होणार आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *